नवी मुंबई मेट्रोचे जाळे विस्तारणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 09, 2026
- 34
5 हजार 575 कोटींचा प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई : मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची मंत्रालयात मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गायमुख ते फाउंटन हॉटेल बोगदा, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्ताराला मुख्यमंत्र्यांची मान्यता देण्यात आली. या सर्व प्रकल्पांसाठी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत 22 हजार 611 कोटी रूपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. नवी मुंबई मेट्रोच्या विस्तारामुळे वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार असून इतर प्रवाशांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17 हजार 36 कोटी; तसेच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1ए आणि मार्ग 2 च्या 5 हजार 575 कोटी, अशा एकूण 22 हजार 611 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पायाभूत सुविधांचे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याने वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
नवी मुंबई मेट्रो हा नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक प्रकल्प असून शहरातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. मेट्रो लाईन 1 सध्या बेलापूर ते पेंधर हा 11.1 किमी लांबीचा आणि 11 स्थानकांचा टप्पा प्रवाशांसाठी खुला आहे. आताया मेट्रो मार्गाचा विस्तार होणार असून तो पेंधर ते आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे. तसेच बेलापुर ते खांदेश्वर असा विस्तारणार आहे. मेट्रोमुळे बेलापूर, खारघर आणि तळोजा परिसरातील प्रवास जलद होत असून रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत नवी मुंबई मेट्रो लाईन-1 ने 1 कोटी प्रवासी टप्पा गाठला आहे, ज्यामुळे ती शहरातील महत्त्वाची वाहतूक सेवा बनली आहे. सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1ए (सागर संगम ते सीबीडी बेलापूर) आणि मेट्रो मार्ग 2 (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-4) या प्रकल्पास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. या विस्तारामध्ये मार्ग 1ए वर दोन आणि मार्ग 2 वर 11 स्थानकांचा समावेश आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे.
गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान 5.86 किलोमीटर लांबीचा सहा पदरी भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान 9.58 किलोमीटर लांबीचा सहा पदरी उन्नत पूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम मुंबईला ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पनवेल; तसेच राष्ट्रीय महामार्ग-48च्या दृष्टीने अधिक वेगवान आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. या प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ मॉडेलद्वारे करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे; तसेच प्रकल्प परिसरात एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मान्यता दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai