Breaking News
व्यवहारांची सखोल चौकशीची मागणी
ठाणे ः अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अखत्यारितील उपनियंत्रक शिधावाटप कार्यालय परिमंडळ-फ ठाणे येथे 25 लाखांच्या शासकीय रक्कमेचा अपहार झाल्याची तक्रार संबंधित विभागाचे प्रधान सचिव यांना प्राप्त झाली आहे. या तक्रारीत संबंधित कार्यालयाच्या व्यवहारांची संपुर्ण चौकशी करण्याची मागणी डिसेंबर 2022 मध्ये प्राप्त होऊनही शासकीय स्तरावर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठाणे येथील उपनियंत्रक शिधावाटप फ परिमंडळ कार्यालयात 25.25 लाख शासकीय रक्कमेचा अपहार झाल्याची तक्रार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागाकडे प्राप्त झाल्याचे मंत्रालयातील सुत्रांकडून कळत आहे. ही तक्रार त्या कार्यालयात कार्यरत असलेल्या एका जबाबदार अधिकाऱ्याने मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री तसेच प्रधान सचिव यांच्याकडे करुन संबंधित कार्यालयाच्या व्यवहारांचे गेल्या पाच वर्षांचे लेखापरिक्षण करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
तक्रारीमध्ये कार्यालयातील रोख रजिस्टर व बँक स्टेटमेंट यांच्यामध्ये 25 लाख 25 हजार 631 रुपयांची तफावत आढळून आल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आहे. एवढेच नाही तर डिसेंबर 2022 च्या गोषवाऱ्यामध्ये 2020 पुर्वीची 20 ते 25 बिलांची नोंद करण्यात आली असून संबंधित बिले ही कार्यालयात उपलब्ध नसल्याचे व त्याबाबत कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती नसल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी त्याबाबत वरिष्ठांना डिसेंबर 2022 मध्ये कळविले आहे. ही तक्रार प्राप्त होऊन पाच महिने उलटून गेल्यावरही कोणत्याही प्रकारचे चौकशीचे आदेश शासकीय स्तरावर न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संबंधित अधिकारी हे मे 2023 मध्ये सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना शासकीय स्तरावरुन अभय मिळत असल्याची चर्चा उपनियंत्रक शिधावाटप कार्यालयात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai