Breaking News
मुंबई : राज्य विधिमंडळाचे सन 2023 चे पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी, तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
विधानभवनात पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह संबंधित उपस्थित होते. विधिमंडळाच्या शतकोतर प्रवासाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ वाटचालीचे दस्ताऐवजीकरण करण्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सूचित केले. विधिमंडळाचा गौरवशाली इतिहास संदर्भग्रंथाच्या माध्यमातून जतन करण्याचे तसेच विविध परिसंवादाद्वारे विधिमंडळाच्या आजपर्यंतच्या कामकाजातून महत्त्वपूर्ण घटना, प्रसंगांना उजाळा देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्याची उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सूचना मांडली.
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्तच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनाचा ठराव अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्याबाबत जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी मांडलेल्या सूचनेवर अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी संमती दर्शवत ठराव मांडण्याचा निर्णय घेतला. दिनांक 17 जुलै ते 4 ऑगस्ट या 19 दिवसांच्या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस 15 असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे (शनिवार, रविवार) असणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai