Breaking News
नवी मुंबई : विमानतळावर आलेले ड्रग्सचे पार्सल क्लिअर करणाऱ्या कस्टम अधिकाऱ्यासह दोन पोलिसांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नेरूळमधील विदेशी (हायड्रो) गांजावरील कारवाईनंतर तपासात ही साखळी उघड झाली आहे. या गुन्ह्यात अद्यापपर्यंत दहा जणांना अटक झाली आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग्जमाफिया कमल चांदवाणी ऊर्फ के. के. याचे रॅकेट उघड केले आहे. याशिवाय त्याला ड्रग्ज तस्करीत सहकार्य करणारे मुंबई विमानतळावरील विदेशी टपाल कार्यालयातील कस्टम अधीक्षक प्रशांत गौर, पोलिस हवालदार सचिन भालेराव, पोलिस नाईक संजय फुलकर यांनाही अटक केली आहे. कमल हा विदेशातून पार्सलद्वारे ड्रग्ज मागवून मुंबई विमानतळावर गौरच्या माध्यमातून पार्सल क्लिअर करायचा, तर त्याच्यासोबत अर्थपूर्ण हितसंबंध जोपासल्याप्रकरणी भालेराव व फुलकर यांच्यावर कारवाई केली आहे. फुलकर हा अमली पदार्थविरोधी पथकाचाच कर्मचारी आहे, तर कमलला विदेशातून नवीन चिचकर ड्रग्ज पाठवायचा, अशी शक्यता आहे. यापूव अटक केलेला सुजित बंगेरा व कमल ड्रग्जच्या व्यवहाराची रक्कम हवाला मार्फत घ्यायचे. त्यानुसार अंकित पटेल व रिकुंदकुमार पटेल या दोन अंगडियांनाही अटक केली आहे. गोपनीय माहितीद्वारे अमली पदार्थविरोधी पथकाने नेरूळमध्ये केलेल्या कारवाईत पुढील रॅकेटची माहिती समोर आली होती. त्यावरून पुढील तपासात कस्टम अधीक्षकासह दोन पोलिस कर्मचारी अशा दहा जणांना अटक केली असल्याचे अपर पोलिस आयुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले, तर इतरही अनेक जण संशयित असून, त्यांचीही चौकशी होणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai