Breaking News
निकष डावलून बेकायदा बढतीचा आरोप
नवी मुंबई : शहर अभियंता शिरीष आरदवाड हे पात्र नसताही सेवा नियमांचे उल्लंघन त्यांना बेकायदेशीर बढती व शहर अभियंतापद दिल्याने सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि महापालिका आयुक्त यांना नोटीस बजावली आहे. 15 दिवसांत सदर नोटीसीला अनुसरुन योग्य ती कारवाई न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा जाधव यांनी दिल्याने पालिका आयुक्त या नोटीसीला कसा प्रतिसाद देतात याकडे पालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांची शहर अभियंतापदी नियुक्ती केल्यानंतर त्यास सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी आक्षेप घेतले होते. अतिरिक्त शहर अभियंता आरदवाड यांची या पदावरील नियुक्ती नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. जाधव यांनी याबाबत राज्याचे लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली असता लोकआयुक्तांनी सदर विषय आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगत कारवाई करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. प्रधान सचिव नगरविकास -2, पालिका आयुक्त यांना तक्रार करुनही सदर नियमबाह्य व बेकायदेशीर नियुक्तीवर कोणतीही कारवाई होत नसल्याने आपण कायदेशीर लढाई लढण्याचे ठरवले असल्याचे जाधव यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना सांगितले.
आरदवाड यांचेवर येत्या 15 दिवसात नियमानुसार कारवाई करण्याची मागणी जाधव यांनी आपल्या वकिलामार्फत प्रधान सचिव नगरविकास -2, पालिका आयुक्त यांना दिली आहे. या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास आपण मुंबई उच्च न्यायालयात याबाबत दाद मागणार असल्याचे त्यांनी नोटीसीत नमुद केले आहे. पालिका आयुक्त जाधव यांची नोटीस गंभीरपणे घेतात की त्यालाही केराची टोपली दाखवतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai