ऐरोली मतदारसंघात शिवसेनेचा जोर
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 03, 2026
- 225
30-35 नगरसेवक निवडून येण्याची नेतृत्वाला आशा
राज्यभरात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून सर्वच राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. अनेकांनी पक्षांतर केले, बंडखोरी केली आणि उमेदवारी अर्ज दाखल केले. नवी मुंबईत बेलापुर आणि ऐरोली या दोन मतदार संघातून 111 जागांसाठी 28 प्रभागाद्वारे निवडणुक होणार आहे. जागावाटपांवरुन झालेल्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर अखेर भाजप आणि शिवसेनेने स्वःबळावर लढण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ऐरोली मतदार संघात तुल्यबळ उमेदवार असल्याने येथे भाजप आणि शिवसेना यांच्यात काटे की टक्कर होणार असे चित्र आहे. ऐरोली मतदारसंघात एकमेकांसमोर तगडे आव्हान उभे केलेल्या या निवडणुकीच्या रिंगणात कोण बाजी मारेल याकडे समस्त नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
- ऐरोली प्रभाग क्र. 1 मध्ये प्रभाग क्र. 1 मध्ये 40,198 मतदार असून तेथे एकुण 37 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये प्रभाग 1 अ ते ड मध्ये मुख्यतः शिवसेना व भाजपात थेट लढत आहे. शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे त्यांच्या उमेदवाराला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- प्रभाग क्र.2 प्रभाग क्र.2 मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत असून या प्रभागात विजय चौगुले विरुद्ध नवीन गवते या लढाईकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. चौगुले यांनी यापुर्वी आमदारकी व खासदारकी लढवली असून पाच वर्ष विरोधीपक्षनेतेपदही भुषवले आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण बाजीगर होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या प्रभागात दोन्ही पक्षांमध्ये समसमान लढाई पाहायला मिळत आहे.
- प्रभाग क्र. 3 प्रभाग क्र. 3 मध्ये भाजप आणि सेनेमध्ये काटे की टक्कर असली तरी तीन क मध्ये उबाठाचे उमेदवार लता कोटकर यांनाही जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या प्रभागात अनंत सुतार विरुद्ध चौगुले यांचे जावई आकाश मढवी यांच्या लढाईकडे सर्वांचे लक्ष असून मागील वेळेस मढवी यांनी अनंत सूतार यांचा पराभव केला होता. यावेळी चौगुले यांचे पुतणे साहील चौगुले यांनीच बंडखोरी केली होती पण त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेने सुटकेचा निश्वास टाकला आहे.
- प्रभाग क्र. 4 मध्ये शिवसेना व भाजप मध्ये लढत पाहायला मिळत असली तरी येथे चारही प्रभागात सध्या सेनेचे वर्चस्व दिसत आहे. नुकताच उबाठातून शिवसेनेत एम.के.मढवी यांनी प्रवेश केल्याने त्यांचा प्रवेश शिवसेनेसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, एम.के.मढवी हे लोकांची नाराजी कितपत दूर करतात यावर त्यांचा विजय अवलंबून आहे.
- पभाग क्र. 5 मध्ये शिवसेनेतून विजय चौगुले यांचे चिरंजीव ममीत चौगुले तर एम.के.मढवी यांच्या पत्नी विनया मढवी व स्नुषा तेजश्री मढवी लढत असून त्यांच्यासमोर भाजपच्या अशोक पाटील, श्रेया जिरगे, राजश्री केणी व रेश्मा मढवी यांचे तगडे आव्हान आहे. दिलीप म्हात्रे हे उबाठा कडून उभे असून ते शिवसेनेची मते खाणार असल्याने त्याचा फटका शिंदेसेनेला बसण्याची शक्यता आहे.
- प्रभाग क्र. 6 मधील उमेदवार सुधाकर सोनावणे, रंजना सोनावणे हे मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांची या प्रभागावर घट्ट पकड असून ते यावेळी भाजपकडून निवडणुक लढवत आहेत. या प्रभागावर पुर्णपणे भाजपचा प्रभाव असल्याने सेना सोनावणे कुंटुंबियांना कितपत टक्कर देते याबाबत साशंकता आहे. त्यामुळे येथे भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
- प्रभाग क्र. 7 मध्ये रमाकांत म्हात्रे यांचे चिरंजीव अनिकेत म्हात्रे व पत्नी मंदाकिनी म्हात्रे आपले नशीब आजमावत आहेत. मंदाकिनी म्हात्रे या गत निवडणुकीत काँग्रेसकडून निवडून आल्या होत्या. आता यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. अ मधून अमिता मानवतकर तर क मधून चैताली पाटील सेनेकडून उभ्या आहेत. येथे थेट लढत शिवसेना व भाजपात असून येथे सेनेचा जोर पाहायला मिळत आहे. परंतु, भाजपही येथे धक्का देण्याची शक्यता आहे.
- प्रभाग क्र. 8 मधून शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांची कन्या सुवर्णा पाटील व द्वारकानाथ भोईर यांची कन्या रोहिणी भोईर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या प्रभागात शिवसेना व भाजपात बरोबरीची टक्कर असून कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे 32,063 मतदार असून 21 उमेदवार नशीब आजमावत असून 4 अपक्षांचा समावेश आहे.
- प्रभाग क्र. 9 मध्ये 31,080 मतदार असून या प्रभागात 14 उमेदवार आपले नशीब आजमावत असून 1 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. या प्रभागात माजी नगरसेवक प्रशांत पाटील व शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ शिंदे आपले नशीब आजमावत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाने तेथे जुल्फीकार कुरेशी यांना तिकीट दिल्याने ते मतदारांवर कितपत प्रभाव पाडतात यावर सौरभ शिंदे यांचे भवितव्य अवलंबून आहे. या प्रभागातही शिवसेना व भाजपमध्ये तोडीसतोड लढाई आहे.
- प्रभाग क्र. 10 मध्ये 39,120 मतदार असून यामध्ये 23 उमेदवार लढण्यास सज्ज झाले असून 6 अपक्ष उमेदवार आहेत. या प्रभागात भाजपचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांच्यासमोर सेनेचे माजी नगरसेवक विजयानंद माने यांचे आव्हान असून या प्रभागातील अन्य भाजपचे उमेदवार सायली शिंदे, चंद्रभागा मोरे व राजू मढवी यांच्यासमोर सेनेने तगडे उमेदवार दिल्याने येथे तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे.
- प्रभाग 11 मध्ये 33,679 मतदार असून यामध्ये 14 उमेदवार आपले नशीब आजमावत असून 1 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागात शिवसेनेच्या माजी नगरसेविका अनिता शिवराम पाटील व भाजपचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांच्या पत्नी संगीता म्हात्रे यांचे आव्हान आहे. या प्रभागातील ड विभागात शिवसेनेचे माजी नगरसेवक शिवराम पाटील व केशव म्हात्रे यांच्यात तुल्यबळ लढत आहे. या लढतीकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. या प्रभागात शिंदेसेनेचा जोर पाहायला मिळत आहे.
- प्रभाग 12 मध्ये 32,442 एकुण मतदार असून यामध्ये 17 उमेदवार आपले नशीब आजमावत असून 1 अपक्ष उमेदवार आहेत. येथे दमयंची आचरे, दिक्षा कचरे व राहुल पवार या तगड्या उमेदवारांना सेनेने उमेदवारी दिली असून भाजपच्या भारती पाटील यांनी या प्रभागात मोठे आव्हान दिले आहे. या प्रभागात शिवसेनेचा जोर दिसत असून भाजप या प्रभागात किती मेहनत घेतो यावर त्यांचे यश अवलंबून राहील.
- प्रभाग क्र. 13 मध्ये 26,798 एकुण मतदार असून यामध्ये 9 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या प्रभागात माजी महापौर सागर नाईक हे उभे असून त्यांच्यासमोरील शिंदेसेनेचे उमेदवार रामदार पवळे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने त्यांच्यापुढे आव्हान नसल्याचे बोलले जात आहे. या संपुर्ण प्रभागावर भाजपचे वर्चस्व असून त्याचा फायदा या निवडणुकीत भाजपला होईल अशी चर्चा आहे.
- नवी मुंबईतील सर्वांत मोठे क्षेत्र असलेला प्रभाग क्र. 14 असून यामध्ये 31,122 एकुण मतदार असून येथून 19 उमेदवारांनी अर्ज भरले असून 5 अपक्ष उमेदवार आहेत. यामध्ये नव्याने नवी मुंबईत समाविष्ट करण्यात आलेल्या 14 गावांचा समावेश आहे. येथे शिवसेनेचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांचे चिरंजीव महेश कुलकर्णी व भाजपचे शशिकांत भोईर आपले नशीब आजमावत आहेत. नव्याने समाविष्ट झालेल्या 14 गावांमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असल्याने तसेच तुर्भे स्टोअर परिसरात शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांचे प्राबल्य असल्याने या प्रभागात भाजप-शिवसेनेत तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे.
ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक जरी आमदार असले तरी सध्याच्या प्रभाग रचनेवरुन आणि शिवसेना आणि भाजप यांनी दिलेल्या तुल्यबळ उमेदवारांवरुन शिवसेनेचा जोर सध्या ऐरोली मतदारसंघातील 30 ते 35 जागांवर दिसत आहे. गणेश नाईकही पट्टीचे राजकारणी असल्याने ते उर्वरित काळात कोणती खेळी खेळतात आणि बाजी पलटवतात यावर शिवसेनेचे ऐरोली मतदारसंघातील यश अवलंबून आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai