‘त्या’ कामकाजाची श्वेतपत्रिका काढणार
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 13, 2026
- 32
चौकशीसाठी तदर्थ समित्या नेमण्यासाठी ठराव प्रस्तावित
नवी मुंबई : प्रशासकीय कालखंडात झालेल्या कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी सत्ताधारी भाजपने पहिल्याच सर्वसाधारण सभेत तदर्थ समित्या नेमण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नगररचना, आरोग्य, अभियांत्रिकी विभाग तसेच इतर विभागांसाठी स्वतंत्र चौकशी समित्या नेमून समित्यांनी कामांची तपासणी करून अहवाल सादर करणे व श्वेतपत्रिका तयार करणे ही जबाबदारी सदस्यांना देण्यात येणार आहे. गणेश नाईकांच्या या भुमिकेनंतर प्रशासकीय कालखंडात झालेल्या कामांमध्ये सर्वांनीच हात धुवून घेतल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नगरसेवकांसह अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
महापालिकेची मुदत मे 2020 नंतर संपल्यावर सरकारने प्रशासकीय राजवट लावली होती. 2020 ते 2026 पर्यंत सुरु असलेली ही राजवट नुकत्याच झालेल्या महापौरांच्या नियुक्तीनंतर संपुष्टात आली. या कालखंडात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वनमंत्री गणेश नाईक करत असून या कालखंडातील कामाची श्वेतपत्रिका जाहीर करावी असा लकडा त्यांनी लावला आहे. त्याला अनुसरुन नवनिर्वाचित महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत तदर्थ समित्या नेमून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची नामी शक्कल सत्ताधारी पक्षाने लढवली आहे. यामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात झालेल्या कामांचे लेखापरिक्षण या समितीमार्फत करण्याचे नियोजन आहे. समितीने अहवाल सादर केल्यानंतर संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस आपण करु अशा इशारा नाईक यांनी दिला आहे.
नाईकांच्या या इशाऱ्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये कुजबुज सुरु झाली आहे. दोन्ही पक्षांतील दिग्गज नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये बरोबरीने कामे झाल्याने विरोधकांना लक्ष केल्यास सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागातीलही कामांचे लेखापरिक्षण करण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देऊ शकतात याची भिती सत्ताधारी नगरसेवकांना आहे. किंबहुना शिवसेना नगरसेवकांना कोंडीत धरण्याचा प्रयत्न नाईकांनी केल्यास गेल्या दहा वर्षातील कामांचे लेखापरिक्षण करण्याचे सुतोवाच वाशीतील एका नगरसेवकाने दिला आहे. गेली 30 वर्षे नाईकांचीच सत्ता असल्याने सर्वच कामांचे लेखापरिक्षण करण्याची मागणी करण्यात येईल असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. शिंदे व नाईक यांच्या राजकीय वादाची झळ आपल्या प्रभागातील कामांना बसू नये अशी अपेक्षा सर्वच नगरसेवकांना असताना नाईक यांच्या या भुमिकेमुळे नगरसेवकांसह सर्वच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परंतु, नाईक आपल्या भुमिकेवर ठाम असल्याने शिंदे व नाईक यांच्यातील राजकीय द्वंद कोणते वळण घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai