शिवछत्रपतींच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 143
नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या वतीने से.1 नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण तसेच से.15 नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात मायक्रोबायलॉजी प्रयोग शाळेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, बेलापूर विधानसभा सदस्य आ. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यासाठी रायगडावर पूजा करणारे पुजारी कृष्णा पाटील, ज्ञानेश्वर लोहार, अनंत केरेमणी उपस्थित होते. संपूर्ण चौक शिवभक्तांच्या गर्दीने फुलून आला होता. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा ललकाऱ्यांनी नागरिक शिवप्रभूंच्या नावाचा गजर करीत होते. नेरुळ से.1 येथे राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रचलीत असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा अशी मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून सातत्याने होत होती. त्यास अनुसरुन या चौकामध्ये असलेल्या घुमटाकार मेघडंबरीखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ब्रॉन्झ धातूच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सिंहासनासह 12 फूट उंच व 2.5 टन वजनाचा असलेल्या या प्रेरणादायी पुतळ्याच्या भोवती ऐतिहासिक वातावरण निर्मितीसाठी सभोवतालच्या क्षेत्राचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्याठिकाणी 4 भाला धरलेले मावळे आणि तोफांसहित 3 मावळे यांच्या शिल्पाकृती उभारण्यात आल्या आहेत. शिल्पसृष्टी कला प्रतिष्ठानचे प्रमुख शिल्पकार प्रा. मोरेश्वर पवार यांनी पुतळ्याची निर्मिती केली आहे. पुतळा स्थापनेसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय परवानग्या प्राप्त आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन नवचैतन्य निर्माण करण्यासाठी व इतिहासाविषयी ज्वलंत अभिमान जागृत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा से.1 नेरुळ येथील चौकातील सिंहासनारुढ पुतळा प्रेरणादायी ठरणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai