तळोजा-कामोठे पालिका उभारणार शिक्षण संकुल
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 113
120 कोटी रुपये खर्चाची तरतूद; निविदा प्रक्रिया सुरू
पनवेल : तळोजा आणि कामोठे या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये पनवेल महापालिका प्रथमच स्वमालकीचे शिक्षण संकुल उभारणार आहे. अत्याधुनिक, सहा ते सात मजली शैक्षणिक इमारतींसाठी सुमारे 120 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या इमारतींमध्ये विद्यार्थ्यांसाठी उद्वाहक, आधुनिक प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या आणि बहुउद्देशीय सभागृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पनवेल महापालिकेला पुढील वर्षी 10 वर्षे पूर्ण होतील, मात्र गेल्या नऊ वर्षांत सिडकोच्या वसाहतींसह 29 गावांमध्ये महापालिकेने एकाही शाळेची स्वमालकीची इमारत उभारलेली नाही. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील 51 शाळांचे हस्तांतरण प्रक्रियेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मूल्यांकन अंतिम टप्प्यात आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शहरातील पूर्व सिडको वसाहत आणि जिल्हा परिषद क्षेत्रात महापालिकेच्या शाळा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे आणि महेशकुमार मेघमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे.
तळोजा आणि पनवेल समुदायाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक सुविधा, उच्च सुरक्षा मानके आणि प्रगत शिक्षणासाठी या शाळा उपयुक्त ठरतील. विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, शिस्त आणि सर्वांगीण विकास घडवणे हे महापालिकेचे लक्ष्य आहे. पुढील शैक्षणिक वर्षात महापालिका जिल्हा परिषदेकडील शाळा हस्तांतरणासाठी पाठपुरावा करीत आहे. - मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका
- शाळांची वैशिष्ट्ये
कामोठे सेक्टर 19 येथे तर तळोजात सेक्टर 7 येथे या शाळा असतील. दोन्ही इमारतींमध्ये 35 8211; 40 वर्गखोल्या, अत्याधुनिक विज्ञान व संगणक प्रयोगशाळा, संशोधन व डिजिटल साक्षरतेसाठी ग्रंथालय, तसेच मोठे बहुउद्देशीय सभागृह असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी वेगळी बस पार्किंगची जागा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai