पालिकेत ठराविक घराण्यांची सुभेदारी!
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 03, 2026
- 212
नवी मुंबई ः सध्या राजकारणाकडे समाजकारण म्हणून न पाहता त्याला व्यावसायिक स्वरुप आल्याने हळूहळू पक्ष ही संकल्पना फक्त कागदावरच पाहिली जात आहे. ठराविक घराण्यांच्या हाती स्थानिक राजकारणाच्या दोऱ्या एकवटल्याने सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठराविक घराण्यांची सुभेदारी पाहायला मिळत आहे. नवी मुंबई महापालिका याबाबत आघाडीवर असून सूमारे 13 नगरसेवकांच्या कुटुंबियांना 25 टक्के तिकीट वाटप झाल्याने सर्व पक्षांनी केले आहे. त्यामुळे सत्तेतून पैसा आणि पुन्हा पैशातून सत्ता या उक्तीनुसार सर्वच राजकारणी वागत असल्याने यावेळी महाराष्ट्रात मोठा आक्रोश ईच्छुकांमध्ये पाहायला मिळाला आहे.
सध्याच्या राजकारणात आयाराम-गयाराम यांची चलती असून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर मात्र आपल्या नेत्यासाठी सतरंजी घालणे आणि उचलणे, घोषणा देणे एवढीच कामे पडली आहेत. राजकारण्यांनी एकदा सत्तेची चव चाखली की त्यांना सतत सत्तेत राहण्याचा मोह आवरत नाही. एकेकाळी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे स्वतः मंत्री, मुलगा आमदार तर पुतण्या महापौर अशी महत्वाची पदे होती. त्याचवेळी नवी मुंबईतील काही ठराविक घराण्यांकडेही सत्तेचे केेंद्रिकरण झाल्याचे पाहायला मिळत होते. यावेळीही शिवसेना, भाजपने सूमारे 19 नगरसेवकांच्या कुटुंबियांसाठी 50 उमेदवारीची तिकीटे वाटली आहेत. त्यामध्ये विजय चौगुले, दशरथ भगत तसेच डी.आर.पाटील यांच्या घरात प्रत्येकी 4 तिकीटे, एम.के.मढवी, शिवराम पाटील, सुरेश कुलकर्णी, नामदेव भगत, अमित मेढकर व नवीन गवते यांना प्रत्येकी 3, तर गणेश नाईक, रमाकांत म्हात्रे, प्रशांत पाटील, सुरज पाटील, अशोक गुरखे, आगोंडे, अविनाश लाड, काशिनाथ पाटील व सोमनाथ वास्कर, संदीप म्हात्रे प्रत्येकी 2 तिकीटे देण्यात आली आहे.
एकमेकांवर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या सर्वच पक्षांनी घराणेशाही केल्याचे उमेदवारी यादीवरुन दिसत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांपेक्षा नातेवाईकांनाच तेही स्वतःसह मुले, पुतणे, पत्नी, सून यांना प्राधान्य दिले आहे. घराणेशाही नाकारणाऱ्या भाजपने एकाच घरात 4 तिकीटे देऊन आणि घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या शिंदेसेनेनेही आपल्या माजी नगरसेवकांच्या मागणीवरुन एकाच घरात 3 तिकीटे देऊ केली आहेत. अनेक ठिकाणी माजी नगरसेवक व पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या घरातच उमेदवारी दिल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. परिणामीइतर इच्छुकांनी नाराजी दाखवत बंडाचा झेंडा उगारला तर काहींनी पक्षांतर करुन आपली उमेदवारी मिळवली. त्यामळे एकुणच या निवडणुकीत घराणेशाहीचा कित्ता गिरवलेल्या भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांना नवी मुंबईकर कितपत स्विकारतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- भाजपची तत्वांना तिलांजली
दशरथ भगत यांना 4, अमित मेढकर, नवीन गवते यांना 3, शुभांगी पाटील, गणेश नाईक सुरज पाटील, अशोक गुरखे, काशिनाथ पाटील, संदीप म्हात्रे यांना प्रत्येकी 2 तिकीटे देण्यात आली आहेत. भाजपच्या एका घरात एक तिकीट या धोरणाला तिलांजली देण्याचा प्रकार नवी मुंबईत घडला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai