प्रतिनियुक्तीवरील अधिकारी नाईकांच्या रडारवर
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 26
अनधिकृत बांधकामांत संबंधितांची जबाबदारी निश्चित करा
नवी मुंबई : नवी मुंबईतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिकेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांचीदेखील भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप माजी खासदार संजीव नाईक यांनी केला आहे. या समस्येसाठी नुसतेच पालिका अधिकारीच नव्हे तर सर्वच घटक जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील सर्वच अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उच्च न्यायालयानेही याप्रकरणी महापालिकेवर अनेकदा ताशेरे ओढले आहेत. पालिकेने 295 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या सर्वांना दिलासा देण्यासाठी अनधिकृत बांधकामांच्या वाढत्या प्रश्नावर माजी खा.संजीव नाईक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. ही बांधकामे अनेक वर्षांपासून निर्माण होत असून, त्यामध्ये बांधकाम करणारे, संबंधित यंत्रणा, स्थानिक पातळीवरील घटक आणि नियमांकडे दुर्लक्ष करणारे सर्वच जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले. अनधिकृत बांधकामांना केवळ स्थानिक अधिकारी किंवा कर्मचारीच नव्हे, तर प्रतिनियुक्तीवर आलेल्या काही अधिकाऱ्यांचाही पाठिंबा मिळाल्यामुळे ही समस्या गंभीर बनल्याचा दावा त्यांनी केला. परंतु कारवाई केवळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरच का? ज्या प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात जी अनधिकृत बांधतकामे उभी राहिली त्यांची जबाबदारीही निश्चित होणे गरजेचे आहे. या प्रकरणातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा अधिकाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी, जबाबदारी निश्चित करणे आणि संबंधितांविरुद्ध कारवाई करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींमध्ये संजीव नाईक यांच्या या आरोपांमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
- लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर मौन
शहराच्या विकासात महत्त्वाचा सहभाग असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर काय भूमिका बजावली यावर संजीव नाईक यांनी मात्र सोईस्कर मौन बाळगले. अनेक नगरसेवकांच्या प्रभागांत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे राहताना सर्वसाधारण सभेत अथवा स्थायी समितीत तासनतास गळा काढणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ही बांधकामे सुरू असताना प्रशासनाकडे नेमकी कोणती भूमिका मांडली, याचा आढावा घेणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
- नाईकांची भुमिका काय?
संजीव नाईक यांनी 1995 ते 1996 तसेच 2000 ते 2004 तर सागर नाईक यांनी 2010 ते 2015 या कालावधीत नवी मुंबईचे महापौरपद भुषविले आहे. त्यामुळे संजीव नाईक व सागर नाईक यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळात नवी मुंबईत उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांचा आढावा होणे गरजेचे आहे. या काळात त्यांनी पालिका आयुक्तांसोबत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराचा तपशील सार्वजनिक होणे गरजेचे आहे.
- सलग पाच वर्षे कार्यरत अधिकारी रडारवर
अतिक्रमण विभागात सलग पाच वर्षे कार्यरत असणाऱ्या तसेच प्रभाग अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रथम कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असणारे रोहित ठाकरे, मयुरेश पवार, अमित पवार व राज नागरगोजे व इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सुरुवातीलाच पाच वर्षे हा निकष कारवाईसाठी गृहित धरल्याने तुर्त इतरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai