ख्रिसमसच्या मुहूर्तावर पहिले विमान उडणार
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 117
नवी मुंबई : दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. 25 डिसेंबर अर्थात नाताळाच्या मुहूर्तावर इंडिगोचे पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे. पहिल्या टप्प्यात भारतातील प्रमुख महानगरे आणि प्रमुख केंद्रांशी थेट वाहतूक सुरू होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले उड्डाण 25 डिसेंबर अर्थात नाताळच्या दिवशी होणार आहे. महिनाभरापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. फ्लाइट्सचे वेळापत्रकही प्रवाशांसाठी खूप सोयीस्कर असे ठेवले आहे. काही विमानांची उड्डाणे दररोज, तर काही फ्लाइट्स विशिष्ट दिवशीच असतील. सकाळपासून ते रात्रीपर्यंत विविध वेळांवर दिल्ली, गोवा आणि कोचीसाठी फ्लाइट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांना सोयीप्रमाणे फ्लाइटची निवड करता येणार आहे.
सुरुवातीला सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासांच्या वेळेत विमानतळाचे संचालन केले जाणार आहे. त्याद्वारे दररोज 23 विमाने उड्डाण घेतील. विशेष म्हणजे विमानतळाच्या सुनियोजित संचलनासाठी एक विशेष मंच स्थापन करण्यात आला आहे. सुव्यवस्थित शुभारंभासाठी विमानतळावर सुरक्षा यंत्रणा, एअरलाईन्स आणि इतर भागधारकांच्या सहभागातून व्यापक ऑपरेशनल रेडिनेस अँड एअरपोर्ट ट्रान्सफर (ओआरएटी) चाचण्या घेण्यात आल्या आहेत. विमानतळाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी 29 ऑक्टोबर 2025 रोजी सीआयएसएफचा ताफा औपचारिकरित्या तैनात करण्यात आला आहे.
नवी मुंबई विमानतळावरून पहिल्या प्रवासासाठी अनेक जण उत्साही आहेत. अकासा एअरच्या अधिकृत वेबसाइटनुसार 25 डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांच्या प्रवासी उड्डाणांना सुरुवात होणार आहे. नवी मुंबई विमानतळावरून अकासा एअर दिल्ली तसेच गोवा, कोची आणि अहमदाबाद या चार शहरांसाठी थेट सेवा देणार आहे. अनेकांनी अकासा एयरलाइन्सवर 25 डिसेंबरसाठी शनिवारी तिकीट बुकिंगचा प्रयत्न केला असता सुरुवातीच्या काळात तब्बल 12 हजार रुपये गोव्याचे दर दाखवत होते. त्यानंतर सहा हजार 300 रुपयांचे दर दाखविण्यात आले. तर, इंडिगोच्या वेबसाइटवर हे दर सात हजार 800 रुपये आहेत. काही कंपन्यांनी तिकीट दर मोठ्या प्रमाणावर वाढविल्याचे दिसत आहे. ख्रिसमस आणि नववर्षात अनेक जण गोव्यामध्ये सुटी साजरी करण्यासाठी जातात. त्यादरम्यान विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू होणार असल्याने पनवेल, नवी मुंबईतील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. इंडिगो ही कंपनीही येथून विमानसेवा सुरू करणार आहे.
फेब्रुवारी 2026 पासून विमानतळ आठवड्यातून 7 दिवस 24 तास कार्यरत राहील आणि दररोजच्या उड्डाणांची संख्या वाढून 34 वर पोहोचेल. सुरुवातीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दर तासाला सुमारे 10 एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स हाताळणार आहे. 25 डिसेंबरला सकाळी 8 वाजता बेंगळुरूहून येणाऱ्या इंडिगो (6460) या विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सकाळी 8.40 वाजता इंडिगो (6882) विमान हैदराबादसाठी उड्डाण घेईल, जी विमानतळावरील पहिली निर्गमन सेवा असेल. लाँच फेजमध्ये इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि अकासा एअर यांच्या उड्डाणांमुळे प्रवाशांना मुंबई आणि देशभरातील 16 प्रमुख गंतव्यांशी सुलभ कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. विमान कंपन्यांच्या वेबसाइटवरून विमान तिकिटांचे बुकिंग करता येणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अशा विविध ठिकाणी प्रवाशांना जाता येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai