2.69 अब्ज लोकांना पोषक आहार परवडत नाही
- by मोना माळी-सणस
- Aug 01, 2026
- 42
64.5 कोटी लोक उपासमारीच्या विळख्यात; 2026 जागतिक अहवालातील वास्तव
नवी दिल्ली ः जगातील भुकेचे प्रमाण काहीसे कमी झाले असले, तरी सुमारे 64.5 कोटी लोक अजूनही उपासमारीचा सामना करत आहेत. तसेच प्रत्येकाच्या ताटात पोषक अन्न पोहोचवण्याचे आव्हान अद्याप कायम असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड 2026 अहवालातून स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार, जागतिक भूकदर 7.8 टक्क्यांवर आला असून, मागील वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. मात्र, 2.1 अब्ज लोक अजूनही मध्यम किंवा गंभीर अन्न-असुरक्षिततेने ग्रस्त आहेत. याचा अर्थ, कोट्यवधी कुटुंबांना पुरेसे आणि सुरक्षित अन्न नियमितपणे मिळत नाही. जगातील अब्जावधी लोकांना संतुलित आहार परवडत नसल्याने कुपोषणाचे संकट कायम असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड 2026 अहवालातील सर्वात गंभीर बाब म्हणजे आरोग्यदायी आणि संतुलित आहाराचा वाढता खर्च. जगातील सुमारे 2.69 अब्ज लोकांना पोषक आणि संतुलित आहार परवडत नाही. खनिजे, जीवनसत्त्वे आणि प्रथिनेयुक्त अन्नपदार्थांच्या वाढत्या किमती हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अनेक देशांमध्ये फळे, भाज्या, दूध, अंडी, डाळी आणि प्रथिनयुक्त अन्न महाग झाल्याने कोट्यवधी नागरिकांना आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे कुपोषण, बालकांमधील वाढ खुंटणे आणि महिलांमधील रक्तक्षय यांसारख्या समस्या कायम असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ही समस्या अधिक तीव्र असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा योजना, कृषी उत्पादनातील वाढ आणि सामाजिक सुरक्षा कार्यक्रमांमुळे भारतासह आशियातील अनेक देशांमध्ये परिस्थितीत सुधारणा दिसून येत आहे. तरीही आफ्रिका खंडात दुष्काळ, संघर्ष आणि आर्थिक अस्थिरतेमुळे भूक व कुपोषणाची समस्या गंभीर स्वरूपात कायम आहे. हवामान बदल, युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक मंदी, महागाई आणि जागतिक व्यापारातील अनिश्चितता यामुळे अन्नसुरक्षेवरील धोके वाढत असल्याचा इशाराही अहवालात देण्यात आला आहे.
- 2030 पर्यंत झिरो हंगरचे स्वप्न धूसर
संयुक्त राष्ट्रसंघाने 2030 पर्यंत झिरो हंगर (भूकमुक्त जग) हे शाश्वत विकास उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र, सध्याचा प्रगतीचा वेग पाहता हे लक्ष्य वेळेत गाठणे कठीण असल्याचे हा 2026 स्पष्टपणे सांगतो. तज्ज्ञांच्या मते, शाश्वत शेती, अन्नाची नासाडी रोखणे, लघु शेतकऱ्यांना बळ देणे आणि सर्वांसाठी परवडणारा पोषक आहार उपलब्ध करून देणे हीच भविष्यातील सर्वात मोठी गरज आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस