नवी मुंबई विमानतळावर ‘भारत टॅक्सी’ चा शुभारंभ
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 37
प्रवासी आणि चालकांसाठी सहकाराचा नवा पर्याय
नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणात गुरुवारी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य सोहळ्यात भारत टॅक्सी या सहकार आधारित टॅक्सी सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सहकार क्षेत्रातील ही अभिनव संकल्पना प्रवाशांना सुरक्षित, पारदर्शक आणि परवडणाऱ्या दरात प्रवासाची सुविधा देतानाच चालकांना मालकी हक्क आणि आर्थिक सक्षमीकरण देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री आणि उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. खासगी ॲग्रीगेटर्सला सहकारी पर्याययावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ओला-उबरसारख्या खासगी ॲग्रीगेटर्सनी वाहतूक क्षेत्रात योगदान दिले असले, तरी सण-उत्सव किंवा पावसाळ्यातील अवाजवी भाडेवाढ आणि चालकांकडून घेतले जाणारे मोठे कमिशन यामुळे प्रवासी व चालक दोघांनाही आर्थिक फटका बसत होता. भारत टॅक्सी ही सहकारावर आधारित सेवा या समस्यांना प्रभावी पर्याय ठरेल. या ॲपद्वारे कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी या तिन्ही सेवा उपलब्ध राहणार असून, चालक आणि प्रवाशाला थेट जोडणारी पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात 600 टॅक्सींचे अनावरण करण्यात आले असून, लवकरच 1,000 हून अधिक टॅक्सी सेवेत दाखल करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्यापासून सुरू झालेली ही सेवा पुढे राज्यभर विस्तारली जाणार आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, या संस्थेमुळे चालक आता केवळ कर्मचारी राहणार नसून संस्थेचे सभासद आणि मालक बनतील. संस्थेच्या नफ्याचा लाभांश थेट चालकांच्या खात्यात जमा होणार आहे. देशभरातील सुमारे 8 लाख चालक या संस्थेशी जोडले गेले असून, आतापर्यंत 77 कोटी रुपये कोणतेही कमिशन न आकारता थेट चालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. दिल्ली आणि गाझियाबादनंतर आता मुंबईत ही सेवा सुरू झाली असून लवकरच पुणे व नागपूरमध्येही विस्तार करण्यात येणार आहे.
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, सहकार हे सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे प्रभावी माध्यम आहे. डिजिटल बुकिंग, पारदर्शक व्यवहार आणि सुरक्षिततेसह परवडणाऱ्या दरात प्रवास उपलब्ध करून देणारी ही सेवा विमानतळावरील प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. तसेच हजारो युवकांना रोजगार आणि चालकांना सन्मानाचे उत्पन्न मिळण्यास मदत होईल.
- दरही सर्वसामान्यांना परवडणारे
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मध्यस्थांची साखळी दूर करून चालक आणि प्रवाशाला थेट जोडण्याचे काम ही व्यवस्था करणार आहे. या सेवेसाठी पहिल्या दीड किलोमीटरचे भाडे 31 रुपये, तर त्यानंतर प्रति किलोमीटर 21 रुपये असे निश्चित करण्यात आले आहे. काळी-पिवळी टॅक्सीच्या धर्तीवर निश्चित केलेले हे दर सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारे आहेत. - भूमिपुत्रांसाठी रोजगाराची संधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त युवकांना या उपक्रमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. राज्य सरकारने ॲग्रीगेटर धोरणाची चौकट तयार केली असून आर्थिक व्यवहारांवर सहकार विभागाचे नियंत्रण राहणार आहे. - सामंजस्य करार आणि प्रमाणपत्रांचे वाटप
यावेळी सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड आणि शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवडक भारत टॅक्सी सारथींना शेअर प्रमाणपत्रे तसेच चालकांना किटचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविकात प्रवीण दराडे यांनी सांगितले की, भारत टॅक्सी हा उपक्रम सहकारातून समृद्धी या राष्ट्रीय संकल्पनेला नवी दिशा देणारा ऐतिहासिक टप्पा आहे. तंत्रज्ञान आणि सहकाराचा संगम घडवून हजारो चालकांना मालकी हक्क, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग उपलब्ध करून देण्याचे हे प्रभावी मॉडेल असल्याचे त्यांनी नमूद केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai