गणेशोत्सवात उत्तम सेवा देण्यावर भर द्या
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 11, 2026
- 26
पोलीस, वाहतूक, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागात समन्वय ठेवण्याचे महापौरांचे निर्देश
पनवेल : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल पालिकेने नागरिकांना सुरक्षित, सुरळीत आणि उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. गणेशमूर्ती आगमनापासून ते विसर्जनापर्यंत नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश महापौर नितीन पाटील यांनी दिले.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. गणेशमूर्ती आगमन व विसर्जनाच्या मार्गांवरील खड्डे, अडथळे आणि धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या. प्रमुख विसर्जन मार्गांची स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती तसेच वडाळे तलाव, वडघर तलाव यांसह आवश्यक ठिकाणी क्रेन, तराफे आणि हायड्रा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांची गर्दी लक्षात घेता आवश्यक ठिकाणी तराफ्यांची संख्या वाढविण्याची सूचनाही महापौरांनी केली.विसर्जन घाटांवर मंडप, बॅरिकेड्स, टेबल, खुर्च्या, ध्वनिक्षेपक यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देतानाच घाटांचे सुशोभीकरण आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले.
गणेशोत्सव काळात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या. विसर्जनाच्या दिवशी गरजेनुसार वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे तसेच विसर्जन घाटांवर सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. विसर्जन स्थळी पोलीस, वाहतूक, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये प्रभावी समन्वय राहावा, यावर महापौरांनी विशेष भर दिला. आरोग्य विभागामार्फत विसर्जन घाटांची स्वच्छता, कचरा व निर्माल्य संकलनासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि वाहने उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. नैवेद्य व निर्माल्य यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्याबरोबरच गणेशोत्सव मंडळांमधून निर्माल्य संकलित करण्यासाठी निर्माल्य रथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विसर्जन घाटांवर आवश्यक वैद्यकीय सुविधाही उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रमुख विसर्जन मार्ग व घाटांवरील विद्युत व्यवस्था सुरक्षित ठेवण्याच्या सूचना विद्युत विभागाला देण्यात आल्या. आवश्यक ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करण्याबरोबरच मिरवणूक मार्गात अडथळा ठरणाऱ्या अथवा धोकादायक वीजतारा हटविण्याचे निर्देश देण्यात आले. वृक्ष प्राधिकरण विभागाला मिरवणूक मार्गातील वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गणेशोत्सव काळात महापालिका हद्दीतील सर्व भागांत पाणीपुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले.
प्रत्येक मोठ्या मंडळासाठी स्वतंत्र स्वच्छता पथक
प्रत्येक मोठ्या गणेशोत्सव मंडळासाठी स्वतंत्र स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जन घाटांवरील सीसीटीव्ही कॅमेरे अद्ययावत ठेवणे, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणे तसेच घाटांवर आवश्यक अग्निशमन वाहने व साधनसामग्री सज्ज ठेवण्याचे निर्देश आयुक्त मंगेश चितळे यांनी संबंधित विभागांना दिले. गणेशोत्सव हा नागरिकांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव आहे. त्यामुळे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि विसर्जन घाटांवर आवश्यक त्या सर्व सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे, असे महापौर नितीन पाटील यांनी स्पष्ट केले. यासाठी मुख्यालय स्तरावर तसेच प्रभाग स्तरावर स्वतंत्र नियोजन समित्या स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीची प्रस्तावना परिवहन विभागाचे कैलास गावडे यांनी केली. उपआयुक्त अभिषेक पराडकर यांनी उपस्थितांचे आभार मानून बैठकीची सांगता केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai