दीड लाख मतदारांची नावे मतदारयादीतून वगळली
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2026
- 31
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या विशेष सखोल फेरतपासणीला (एसआयआर) वेग आला आहे. पूर्वीच्या मतदारयादीशी जुळणारी नावे, पत्ता, वय किंवा नावातील बदल यांची तपासणी केली जात आहे. सध्या 4 लाख 704 मतदारांची नोंद असून, वगळलेल्या नागरिकांपैकी 12 हजार जणांनी अर्ज क्रमांक 6 द्वारे नव्याने मतदार नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. आणखी 50 ते 80 हजार नवीन मतदारांचे अर्ज येण्याची शक्यता आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघात पूर्वी 6 लाख 84 हजार मतदार होते. त्यापैकी चार लाख 704 मतदारांची नावे कायम राहिली असून, उर्वरित दीड लाख मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याचे निवडणूक विभागाच्या माहितीत नमूद आहे. लोकसभा निवडणुकीत 2 लाख 95 हजार 973 मतदारांनी, म्हणजे 50.5 टक्के मतदारांनी मतदान केले. विधानसभा निवडणुकीत 3 लाख 82 हजार 335 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 58 होती. 2025च्या महापालिका निवडणुकीत 3 लाख 8 हजार 708 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 55.67 होती. मागील तीन निवडणुकांमधील प्रत्यक्ष मतदानाचा आधार घेऊन एसआयआरमध्ये मतदारयादीची फेरतपासणी केली जात आहे. 2002 मध्ये पनवेल मतदारसंघात 1 लाख 60 हजार मतदार होते. 24 वर्षांत ही संख्या 4 लाख 704 वर पोहोचली आहे. खारघर आणि कामोठे येथे मतदारसंख्येत सर्वाधिक, जवळपास दहापट वाढ झाली आहे. एसआयआरमध्ये अर्ज न केलेल्या 2 लाख 83 हजार मतदारांची नावे तपासणीच्या प्रक्रियेत होती. त्यापैकी 89 हजार मतदारांची नावे 2002च्या यादीशी जुळली नाहीत, तर 61 हजार मतदारांच्या नाव, वय किंवा पत्त्यात दुरुस्ती आवश्यक असल्याचे चांडक यांनी स्पष्ट केले. याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत.
‘पनवेल मतदारसंघातील 574 मतदान केंद्रांसाठी 574 बीएलओ नियुक्त आहेत. बीएलओ घरोघरी फिरून माहिती घेत आहेत. मतदारांनी कागदपत्रे बीएलओंकडे द्यावीत किंवा व्हॉट्सॲपवर पाठवावीत. ऑनलाइन अर्ज किंवा बीएलओमार्फत नाव नोंदविता येणार आहे. मतदारांना शिबिरात रांगेत उभे राहण्याची गरज नाही. नाव वगळण्यापूर्वी मोबाइलवर, प्रत्यक्ष नोटीस आणि सुनावणीची संधी दिली जाईल. वगळण्यात येणाऱ्या नावांची यादी राजकीय पक्षांच्या बीएलएना दिली जाईल. संबंधित मतदार हजर न राहिल्यास एआरओ निर्णय घेतील. आतापर्यंत एकही नाव वगळण्याबाबत लेखी तक्रार आलेली नसल्याचे निवडणूक निर्णय़ अधिकारी पवन चांडक यांनी सांगितले.
मतदारांनी एसआयआरबाबत संभ्रम बाळगण्याची गरज नाही. सूमारे साडेपाचशे बीएलओ 12 नोव्हेंबरपर्यंत घरोघरी भेट देऊन आवश्यक माहिती व कागदपत्रे घेतील. मतदारांना सुनावणीसाठी रांगेत बोलावले जाणार नाही. नाव वगळण्यापूर्वी मोबाइलवर, प्रत्यक्ष नोटीस आणि सुनावणीची संधी दिली जाईल. नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करून आपली कागदपत्रे वेळेत द्यावीत. - पवन चांडक, निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल विधानसभा मतदारसंघ
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai