अमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांचा दुहेरी प्रहार
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2026
- 31
उलवेतील टोळीवर मोक्का 344 ग्रॅम एमडी जप्त; 86 लाखांच्या अमली पदार्थ प्रकरणात आठ जणांविरोधात कारवाई
नवी मुंबई : नवी मुंबईत अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. नेरुळ येथील सीताबाई इंगळे या महिला आरोपीला पीआयटी एनडीपीएस कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. दुसरीकडे, उलवे परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इमरान हुसेन खान ऊर्फ बवंडर याच्यासह सात साथीदारांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
प्रतिबंधात्मक स्थानबद्धता आणि संघटित गुन्हेगारीविरोधातील कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. वारंवार गुन्हे, तरीही सुधारणा नाही. नेरुळ येथे राहणाऱ्या सीताबाई इंगळे हिच्याविरोधात यापूर्वी अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल होते. तिच्यावर कारवाई करूनही तिच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती संकलित करून पीआयटी एनडीपीएस कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन स्थानबद्धतेचा आदेश दिल्यानंतर इंगळे हिला नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. या आदेशानुसार तिला एक वर्ष स्थानबद्ध ठेवण्यात येणार आहे. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या स्तरावर पीआयटी एनडीपीएस कायद्यांतर्गत करण्यात आलेली ही पहिली कारवाई आहे. अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत वारंवार सहभागी होणारे आरोपी जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याच गुन्ह्यांत सक्रिय होऊ नयेत, यासाठी या कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद आहे. अशा सराईत आरोपींची यादी तयार करण्यात आली असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील कारवाई केली जाणार आहे.
- उलवेतील अमली पदार्थांच्या टोळीवर मोक्का
उलवे परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीविरोधातही नवी मुंबई पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. इमरान हुसेन खान ऊर्फ बवंडर हा या टोळीचा प्रमुख असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यासह सात साथीदारांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीकडून मुंबई, नवी मुंबई आणि नाशिक परिसरात अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी 344 ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ जप्त केला होता. त्याची अंदाजित किंमत सुमारे 86 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. - कारवाईसोबत जनजागृतीवरही भर
अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच तरुणांमध्ये, विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यावरही पोलिसांनी भर दिला आहे. ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमाच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत वारंवार सहभागी होणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई, संघटित टोळ्यांविरोधात मोक्का आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, अशा तिहेरी रणनीतीतून अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला आळा घालण्याचे आव्हान नवी मुंबई पोलिसांनी स्वीकारले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai