Breaking News
दिघा विभागात आयुक्तांनी केली पाहणी
नवी मुंबई ः शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष म्हणून नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पावसाळापूर्व कामे 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून त्या अनुषंगाने त्यांनी दिघा विभागामध्ये प्रत्यक्ष पाहणी करत सुरु असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले.
यामध्ये त्यांनी ग्रीन वर्ल्ड पाठीमागील मोठया नाल्याची पाहणी करत त्याची व्यवस्थित साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या तसेच नाल्याच्या बाजूस एमआयडीसीच्या जागेत मोठया प्रमाणावर डेब्रीज पडत असल्याचे लक्षात घेत त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने एमआयडीसीला याकामी महापालिकेमार्फत सहकार्य करुन ते थांबवावे असे निर्देशित करण्यात आले.
दिघागाव रेल्वे स्टेशन समोरील मुकंद कंपनी जवळील अंडरपासच्या ठिकाणी नागरिकांना चालण्यास त्रास होउु नये व त्याठिकाणी पावसाळयात पाणी साचण्याची समस्या दूर व्हावी या दृष्टीने रस्त्यापासून काहीसा उंचावर बांधण्यात आलेला पदपथ नागरिकांच्या सोयीचा असल्याचे लक्षात घेत तो पदपथ पुढे साठेनगरपर्यंत वाढवावा व त्याबाजूची कुंपणभिंतही पुढे वाढवावी तसेच यामध्ये अडथळा आणणारे अतिक्रमण हटवावे असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
ग्रीन वर्ल्ड समोरील बाजूस रेल्वे रुळांशेजारी नाल्याच्या बाजूला असलेल्या दुर्लक्षित जागेची नीटनेटकी स्वच्छता करुन त्याठिकाणी सुशोभिकरण करावे तसेच ठाणे बेलापूर रस्त्याचा त्याठिकाणी खंडीत झालेला पदपथ पुढे मुकंद अंडरपासपर्यंत पूर्ण करावा आणि पादचाऱ्यांना अडथळामुक्त चालता यावे अशी सोय करावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. याकरिता त्याठिकाणी असलेला पंपही शेजारील उद्यानाच्या कोपऱ्यात स्थलांतरीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याठिकाणचे सामुदायिक शौचालय काढून तेथे आरसीसी शौचालय उभारण्याचेही आयुक्तांनी सूचित केले.
शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता काटेकोरपणे करण्याचे निर्देशित करीत विशेषत्वाने दिघा ते ऐरोली चिंचपाडयापर्यंत ठाणे बेलापूर मार्गावर दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते हे लक्षात घेत पोलीसांच्या मदतीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. ठाणे बेलापूर मार्गावर दिघाबाबा देवस्थान समोरील दुर्लक्षित जागा स्वच्छ करुन त्याठिकाणी सुशोभिकरण करावे व त्या संपूर्ण रस्त्यावर पदपथ चालण्यायोग्य व्यवस्थित करावे आणि त्यामध्ये अडथळा येणारे अतिक्रमण दुर करावे असे स्पष्ट सूचना योवळी देण्यात आल्या.अधिकाऱ्यांनी नियमित क्षेत्रभेटी देत नागरिकांना जाणवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तत्पर राहण्याचे निर्देश देतानाच आयुक्त डॉ.कैलास शिंदे 15 मे पर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी शहर अभियंता शिरीष आरदवाड, अति.शहर अभियंता अरविंद शिंदे, परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, परिमंडळ 2 घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त संतोष वारूळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai