Breaking News
नवी मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागाचे माहिती उपसंचालक रवी गीते हे नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या चार दशकांच्या पत्रकारिता आणि शासकीय सेवेीय योगदानाचा गौरव करण्यासाठी कोकण भवन, नवी मुंबई येथे एका छोटेखानी कार्यक्रमात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला, ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, सहायक संचालक संजिवनी जाधव-पाटील, उपसंपादक प्रविण डोंगरदिवे, तसेच कोकण विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि पत्रकार मित्र उपस्थित होते.
रवी गीते यांचा कारकीदचा प्रारंभ नामवंत वृत्तपत्रांमधून झाला. ‘लोकपत्र’, ‘नवराष्ट्र’ आणि ‘सामना’ या प्रमुख दैनिकांत त्यांनी पत्रकार म्हणून कार्य केले. सामाजिक भान, भाषेवर प्रभुत्व आणि सजग दृष्टीकोन यामुळे त्यांची पत्रकारिता वाचकप्रिय ठरली. याच अनुभवाचा उपयोग त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागात सेवा बजावताना केला. शासकीय सेवेत त्यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात सहायक संचालक या पदावरून प्रारंभ केला. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी प्रशासन व प्रसारमाध्यमांमध्ये समन्वयाचा उत्तम आदर्श निर्माण केला. प्रामाणिक, मनापासूनची सेवा आणि जनसंपर्क कौशल्य हे गीते यांच्या कार्यशैलीचे विशेष पैलू होते. या कार्यक्रमात त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे, मृदू वर्तनाचे आणि नेहमी मार्गदर्शक म्हणून दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. उपस्थितांनी गीते हे ‘आरोग्याबाबत जागरूक’ तत्काळ निर्णय क्षमता असणारे शासकीय अधिकारी अशी विविध विशेषणे देत मनोगते व्यक्त केली. गत आठवड्यातच त्यांनी कोकण विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला. नवी मुंबईतील कोकण भवन येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात प्रभारी उपसंचालक अर्चना शंभरकर यांच्याकडून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai