Breaking News
अंशिका यादव 95 टक्के गुण संपादन करीत नमुंमपा शाळांमध्ये सर्वप्रथम
नवी मुंबई ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीमध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून नवी मुंबई महापालिका माध्यमिक शाळांचा निकाल 94.72 टक्के एवढा लागलेला आहे.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 104 राजष छत्रपती शाहू महाराज विद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, रबाळे येथील अंशिका अंगद यादव ही विद्यार्थिनी 95 टक्के गुण संपादन करुन महानगरपालिकेच्या 23 माध्यमिक शाळांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तिचे व सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधून विद्यार्थ्यांनी दहावीची शालांत परीक्षा दिली. या परीक्षेत नमुंमपा माध्यमिक 23 शाळांतील 2698 विद्याथ सहभागी झाले होते. त्यापैकी 2568 विद्याथ उत्तीर्ण झाले असून महानगरपालिका शाळांचा एकूण निकाल 94.72 टक्के एवढा लागलेला आहे. विशेष म्हणजे नमुंमपा संचलित 23 माध्यमिक शाळांमधून नमुंमपा शाळा क्रमांक 108 दिघा, नमुंमपा शाळा क्र.111 तुर्भ स्टोअर, नमुंमपा शाळा क्र. 116 सानपाडा या 3 महानगरपालिका माध्यमिक शाळांचा 100% निकाल लागलेला आहे. या 23 शाळांमधून राजष छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा शाळा क्रमांक 104, आंबेडकर नगर, रबाळे येथील अंशिका अंगद यादव या विद्यार्थिनीने 95 टक्के गुण संपादन करीत महानगरपालिका शाळांमध्ये सर्वप्रथम क्रमांकाचे सर्वोत्तम गुण संपादन केले. नमुंमपा शाळा क्रमांक 118 पावणे येथील साहिल युवराज जाधव हा विद्याथ 94.60 टक्के गुण संपादन करुन व्दितीय क्रमांकाचा आणि नमुंमपा शाळा क्रमांक 121, कुकशेत येथील विद्यार्थिनी रुक्कया गुफरान अन्सारी हिने 94 टक्के गुण संपादन करीत तृतीय क्रमांकाचा बहुमान पटकाविला.
नमुंमपा शाळेतील विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारेआणि शिक्षण अधिकारी श्रीम. अरुणा यादव यांनी उज्जवल यश संपादन करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचेही अभिनंदन करीत भविष्यातील अधिक चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागामार्फत सर्व महानगरपालिका माध्यमिक शाळांना 21 मार्गदर्शक अपेक्षित संच पुरविण्यात आले होते. तसेच दिवाळीच्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यानंतर दररोज एक तास विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेला सराव प्रश्नसंच उपलब्ध करुन देऊन प्रश्नसंचाचा उपयोग करुन शाळा स्तरावर सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शालेय स्तरावर मुख्याध्यापक व शिक्षकांनी मेहनत घेतल्याची फलश्रूती म्हणजे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश असून याबद्दल विद्यार्थ्यांसह त्यांच्या शिक्षकांचेही कौतुक होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai