Breaking News
आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे पाहणीअंती निर्देश
नवी मुंबई ः महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सुविधा कामांची प्रत्यक्ष पाहणी करून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने या कामांना गती दिली जात आहे. या अनुषंगाने आयुक्तांनी वाशी व कोपरखैरणे विभागात अमृत 2.0 अंतर्गत सुरू असलेल्या मलउदंचन केंद्रे तसेच कोपरखैरणे सेक्टर 19 येथील धारण तलावाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करीत मौलिक सूचना केल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत शहर अभियंता शिरीष आरदवाड, अति.शहर अभियंता अरविंद शिंदे आणि संबंधित अधिकारी व अभियंते उपस्थित होते.
कामांची पाहणी करताना आयुक्तांनी वाशी सेक्टर 3, सेक्टर 12 व सेक्टर 28 या तिन्ही ठिकाणच्या मलउदंचन केंद्रांच्या बांधकामाची पाहणी करीत ही कामे जलद गतीने गुणवत्ता राखून पूर्ण करण्याचे निर्देश दिले. केंद्र सरकारच्या अमृत 2.0 अंतर्गत ही कामे केली जात असल्याने विहित कालमर्यादेमध्ये ही कामे पूर्ण होतील याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अशाच प्रकारे अमृत 2.0 योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सेक्टर 19 कोपरखैरणे येथील धारण तलावाच्या कामाला गती देण्याचे निर्देश देतानाच त्याठिकाणी बांधण्यात येत असलेल्या मलनि:स्सारण केंद्राच्या देखभाल - दुरूस्ती कामाचेही आत्ताच नियोजन करून ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. हा तलाव मध्यवत असून या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात हे लक्षात घेत येथे नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी बोटींग व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि या महसूलातून केंद्राचा देखभाल दुरूस्ती खर्च होईल अशा प्रकारच्या नियोजनाची खातरजमा करून घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.
या पाहणी दौऱ्यात वाशी सेक्टर 10 येथील भूमीगत व उच्चस्तरीय जलकुंभ कामाचीही पाहणी करीत आयुक्तांनी हे काम जलद पूर्ण करावे तसेच जलवितरणाच्या चाचणीचेही आत्तापासूनच नियोजन करून ठेवावे असे सूचित केले. पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन या दोन्ही बाबी महत्वाच्या असून त्या लवकरात लवकर नागरिकांसाठी उपयोगात येतील अशाप्रकारे या कामांचे नियोजन करावे असे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी पाहणी दौऱ्याप्रसंगी दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai