Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली सेंट्रल पार्कमधील जलतरण तलाव मंगळवारी (13 मे) सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. या तलावाचे दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण झाले होते. तथापि, विविध प्रशासकीय कारणांमुळे लोकार्पण रखडले होते. अखेर सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, महापालिकेने जलतरण तलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकार्पणापूवच या सुविधेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शनिवारी सुरू झालेल्या प्रवेश अर्ज प्रक्रियेत पहिल्याच दिवशी 300 अर्ज दाखल झाले. तर, रविवारीही 150 हून अधिक नागरिकांनी अर्ज सादर केले आहेत. लोकार्पणाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये (13 व 14 मे) प्रशिक्षित जलतरणपटूंना वापरासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. तर 15 मेपासून नव्याने प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेश खुला करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जलतरण प्रशिक्षणाकरिता माफक शुल्क आकारण्यात आले असून, 5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी केवळ 100 रुपयांचे प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
सुमारे 17 कोटी 50 लाख रुपयांच्या खर्चाने उभारलेल्या सेंट्रल पार्कमध्ये एकूण 39 हजार 135 चौरस मीटर क्षेत्रावर जलतरण तलावासह स्केटिंग रिंक, मिनी फुटबॉल टर्फ आदी क्रीडा सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. पंचमहाभूतांच्या संकल्पनेवर आधारित या पार्कमध्ये भविष्यात क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्याचा महापालिकेचा मानस असून, क्रीडा विभागामार्फत विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमही राबविण्यात येणार आहेत.
पालिकेचा उद्देश केवळ पोहण्याच्या सरावासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यापुरता मर्यादित नाही. या जलतरण तलावाच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी विशेष प्रशिक्षण, सुविधा आणि देखरेख सुनिश्चित केली जाणार आहे.- अभिलाषा म्हात्रे, उपायुक्त, क्रीडा आणि सांस्कृतिक विभाग,
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai