Breaking News
भाजपाचा घराणेशाहीला पुर्णविराम
नवी मुंबई ः भाजपने नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी आमदार मंदा म्हात्रे यांच्या गोटातील उच्चशिक्षित नेते राजेश पाटील यांची नेमणुक केली आहे. ही नेमणुक होऊ नये म्हणून नवी मुंबईतील घराणेशाहीने पुर्ण विरोध केला होता. परंतु, प्रदेशाध्यक्ष यांनी नवी मुंबईत यापुढे घराणेशाही चालणार नाही तर राजेशाहीच चालेल असा संदेश राजेश पाटील यांच्या नेमणुकीने नवी मुंबईतील सर्व भाजप नेत्यांना दिला आहे.
नवी मुंबईत आमदार मंदा म्हात्रे व मंत्री गणेश नाईक यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सौख्य असल्याचे सर्वश्रुत आहे. भाजपने संदीप नाईक यांना नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नेमणुक केल्यावर त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या केलेल्या नेमणुका वादातीत ठरल्या होत्या. या नेमणुकांबाबत आ. म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींकडे नाईकांच्या हुकूमशाही कारभाराबाबत तक्रार केली होती. त्यातच विधानसभा निवडणुकीत जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केलेली बंडखोरी भाजपच्या जिव्हारी लागली होती. विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांनी नाईकांना मंत्रीमंडळात जरी स्थान दिले असले तरी त्यांना ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संदीप नाईक यांच्या बंडखोरीनंतर जिल्हाध्यक्षपद पुन्हा रामचंद्र घरत यांना देण्यात आले होते. त्यामुळे नव्याने नेमणुक होणाऱ्या या पदासाठी नाईक व म्हात्रे गटातील अनेकजण इच्छुक होते. नाईक गटाकडून सागर नाईक, जयवंत सुतार, रविंद्र इथापे ही नावे चर्चेत होती.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आ. मंदा म्हात्रे यांचे समर्थक डॉ. राजेश पाटील यांना भाजप जिल्हाध्यक्षपदी नेमणुक करुन सर्वानाच धक्का दिला. डॉ. राजेश पाटील हे उच्चशिक्षित असून त्यांचेकडे तीस वर्षांचा राजकीय अनुभव आहे. शिवसेनेत असताना त्यांचेवर कोणत्याही प्रकारची राजकीय जबाबदारी नाईकांनी दिली नाही. आपल्याला डावलले गेल्याची खंत त्यांना नेहमीच सतावत होती. त्यांनी भाजपात प्रवेश करुन आ. मंदा म्हात्रे यांच्यासोबत भाजपचे प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून व संदीप नाईक यांच्या बंडखोरीची गंभीर दखल घेऊन भाजप पक्षश्रेष्ठींनी नवी मुंबईला चांगला उच्चशिक्षित चेहरा जिल्हाध्यक्ष म्हणून दिला आहे. या नेमणुकीने यापुढे भाजपामध्ये घराणेशाही चालणार नाही हा संदेशही पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना दिला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai