Breaking News
नवी मुंबई ः नवी मुंबईत रिक्षांची संख्या वाढत असली तरी प्रवाशांना उद्भवणाच्या समस्या मात्र सुटलेल्या नाहीत. काही रिक्षाचालकांच्या मनमजचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून या कारवाईत 2 हजार 142 बेशिस्त रिक्षाचालकांकडून 3 लाख 3 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
नवी मुंबईत रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. कमी अंतर असल्याने भाडे नाकारणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे तसेच वाहतूक नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांची संख्याही तुलनेने मोठीच आहे. या प्रकरणी अनेक तक्रारी वाहतूक शाखेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पोलीस शाखेने 1 ते 23 मे दरम्यान एक विशेष मोहीम राबवली. यात भाडे नाकारणाऱ्या 857 रिक्षाचालकांवर कारवाई करून 48 हजार 100 रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारे 1 हजार 285 रिक्षाचालकांवर कारवाई करून 55 हजार 200 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. अशा एकूण 2 हजार 142 रिक्षाचालकांवर कारवाई करून 3 लाख 3 हजार 300 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून व्यवसाय करावा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच वाहतूक नियम पायदळी तुडवणारे, भाडे नाकारणारे रिक्षाचालक असतील तर नागरिकांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रार नोंदवावी.- तिरुपती काकडे (पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा)
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai