Breaking News
नवी मुंबई ः महापालिकेची रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्र स्तरावर राष्ट्रीय असांसर्गिक रोग तपासणी कार्यक्रमांतर्गत 30 वर्षावरील स्त्री व पुरुषांची तपासणी करण्यात येते व त्याची नोंदणी पोर्टलवर करण्यात येत असते. या कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात 21 ते 24 मे 2025 या कालावधीत शासनामार्फत कॅन्सर व्हॅन पाठविण्यात आली होती. सदर व्हॅनमध्ये मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग याबाबत तपासणी व चाचण्या करण्यात आल्या. या तपासणीचा लाभ 627 नागरिकांनी घेतला.
राष्ट्रीय असांसर्गिक रोग तपासणी कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग याबाबत तपासणी व चाचण्या केल्या जात आहेत. तसेच सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ येथे संशयित रुग्ण संदर्भित करण्यात येत आहेत. या मोहीमेचे नियोजन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. या अंतर्गत चार नागरिक आरोग्य प्राथामिक केंद्रांच्या क्षेत्रात रुग्ण तपासणी करण्यात आली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या तपासणीचा लाभ 627 नागरिकांनी घेतला. यामध्ये 491 नागरिकांनी मुख कर्करोग, 289 नागरिकांनी स्तन कर्करोग व 777 महिलांनी गर्भाशय मुख कर्करोग विषयक तपासणी करून घेतली. यामध्ये 21 मे 2025 रोजी राजमाता जिजाऊ रूग्णालय, ऐरोली येथे 91 लाभार्थींनी या तपासणीचा लाभ घेतला त्यामध्ये मुख कर्करोगकरिता 78, स्तन कर्करोगकरिता 58 व गर्भाशय मुख कर्करोगाची 45 नागरिकांनी तपासणी करून घेतली. या तपासणीप्रसंगी डॉ. अशफाक सिद्धीकी, डॉ. रविंद्र म्हात्रे व डॉ.सचिन चिटणीस हे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. अशाचप्रकारे 22 मे 2025 रोजी श्रमिक नगर, पावणे येथे 185 लाभार्थींनी तपासणीचा लाभ घेतला. त्यामध्ये मुख कर्करोगकरिता 185, स्तन कर्करोगाकरिता 92 व गर्भाशय मुख कर्करोगकरिता 40 रुग्ण यांची तपासणी करण्यात आली. सदर तपासणीकरिता डॉ. अशफाक सिद्धीकी व डॉ.वंदना नारायणे हे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
दि.23 मे रोजी गावदेवी मैदान, जुहूगांव येथे 155 लाभार्थींनी या तपासणीचा लाभ घेतला. त्यामध्ये मुख कर्करोगकरिता 155, स्तन कर्करोगकरिता 56 व गर्भाशय मुख कर्करोगकरिता 36 रुग्ण यांची तपासणी करण्यात आली. सदर तपासणीकरिता डॉ. अशफाक सिद्धीकी व विद्या वर्मा हे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. दि. 24 मे 2025 रोजी मॉसाहेब मिनाताई ठाकरे हॉस्पिटल, नेरुळ येथे 196 लाभार्थींनी तपासणीचा लाभ घेतला. त्यामध्ये मुख कर्करोगकरिता 113, स्तन कर्करोगकरिता 83 व गर्भाशय कर्करोगकरिता 56 नागरिक यांनी तपासणी करून घेतली. सदर तपासणीकरिता वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे आणि डॉ. अशफाक सिद्धीकी, डॉ. उध्दव खिलारे व डॉ.सुरेश पाटील हे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai