Breaking News
पहिल्याच पावसात दाणादाण ; व्यापाऱ्यांची प्रशासनावर आगपाखड
नवी मुंबई ः पहिल्याच पावसात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पूर्णपणे चिखलात गेला आहे. एपीएमसीतील कांदा-बटाटा, मसाला, धान्य, भाजीपाला आणि फळ बाजार या सर्वच विभागांत पावसाने मोठे नुकसान केले आहे. विशेषतः मसाला मार्केट परिसरात तर पाऊस गेल्यानंतर 48 तास उलटूनही पाणी तुंबलेच होते.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असणाऱ्या एपीएमसीमध्ये कोट्यवदींची उलाढाल होते मात्र आजही तेथील व्यापारी, विक्रिते मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत याची प्रचिती पहिल्याच पावसात आली आहे. संपुर्ण बाजार परिसर जलमय झाल्याचे चित्र होते. फळ व भाजीपाला बाजाराच्या प्रवेशद्वारांवर पाणी साचले होते. नालेसफाईच्या नावाखाली उपसून ठेवलेला गाळ रस्त्यावर पसरल्याने व्यापारी आणि ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. पावसामुळे ग्राहकांनीही बाजाराकडे पाठ फिरवल्याने शिल्लक राहिलेला आणि सडलेला माल टाकल्यामुळे बाजारात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरल्याने रोगराईचा धोका अधिकच वाढला. गाळ रस्त्यावरील गटारांमध्ये अडकत असून, गटारातून पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे बाजाराच्या प्रवेशद्वारावरच गाळ आणि घाणीचे पाणी तुंबून राहिले आहे. या गाळामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
दरवर्षी टेंडर निघतात, कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण प्रत्यक्षात नाले साफ होतात कुठे? असा सवाल उपस्थित करत व्यापाऱ्यांनी प्रशासनावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले. जिथे नालेच नाहीत तिथे सफाई दाखवली जाते, ही नालेसफाई नाही, निधीची हातसफाई आहे! अशी संतप्त प्रतिक्रिया बाजार घटकांनी दिली. यावर लवकर उपाय न केल्यास आंदोलनाचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
पाच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या संचालक मंडळाने नालेसफाईच्या कामांमध्ये गंभीर अनियमितता केल्याचा आरोपदेखील व्यापाऱ्यांनी केला आहे. जिथे गटारच नाही तिथे सफाईचे दरपत्रक, आणि जिथे गटार आहे तिथे पाणी साचलेलं! असा संताप व्यक्त करत व्यापाऱ्यांनी मंडळाच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवलं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai