Breaking News
नवी मुंबई ः महापालिका क्षेत्रात आपत्ती निवारणासाठी विभागवार यंत्रणा असून यामध्ये पालिकेचे अग्निशमन दल महत्वाची भूमिका बजावते. त्या कार्यवाहीत अधिक सक्षमता येण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद पथक तसेच ठाणे महापालिकेचे आपत्ती प्रतिसाद पथक या धतवर नवी मुंबई पालिकेने आपत्कालीन प्रतिसाद दल स्थापन केले आहे. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून नवी मुंबई पालिका अग्निशमन विभागातील प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी तसेच नागरी संरक्षण दलामधील अधिकारी यांचा समावेश असणारे हे स्वतंत्र आपत्कालीन प्रतिसाद दल यापुढील काळात नवी मुंबईतील आपत्ती निवारणासाठी सज्ज असणार आहे.
नवी मुंबई शहरामध्ये कोणतीही नैसर्गिक अथवा मानव निर्मित आपत्ती घडल्यास अग्निशमन दलास पाचारण केले जाते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन अग्निशमन विभागातील प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी आणि नागरी संरक्षण दलामधील अधिकारी यांचा समावेश असणारे स्वतंत्र आपत्कालीन प्रतिसाद दल स्थापना करण्यात आलेले आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्राकरिता आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी परिमंडळ- 1 व परिमंडळ-2 अंतर्गत परिमंडळनिहाय आपत्कालीन प्रतिसाद दल स्थापित करण्यात आलेले असून हे दल उपआयुक्त (आपत्ती व्यवस्थापन) यांचे देखरेख व नियंत्रणाखाली कार्यरत राहतील. सहा.अग्निशमन केंद्र अधिकारी प्रेमानंद ठाकूर हे परिमंडळ 1 आपत्कालीन प्रतिसाद दलाचे तसेच सहा.अग्निशमन केंद्र अधिकारी पदाजी निरगुडे हे परिमंडळ 2 आपत्कालीन प्रतिसाद दलाचे नियंत्रण अधिकारी असणार असून त्यांच्या नियंत्रणाखाली विभागीय क्षेत्ररक्षक, अग्निशमन प्रणेता, अग्निशामक अशी 11 जणांचा प्रशिक्षित समुह मदतकार्यासाठी दक्षतेने कार्यरत असणार आहे.
हे आपत्कालीन प्रतिसाद दल नवी मुंबई महापालिका मुख्यालयात 24 तास कार्यरत असणार आहे. आपत्ती किंवा दुर्घटनेचे स्वरुप मोठे असल्यास दलामधील सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्रित काम करतील. त्याचप्रमाणे या दलामध्ये अग्निशमन दलातील प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी असल्याने तसेच त्यांना नागरी संरक्षण दलाची साथ असल्याने मदतकार्य सक्षमतेने होणार आहे. त्याचप्रमाणे परिमंडळनिहाय दोन स्वतंत्र समुह कार्यान्वित करण्यात आल्याने जलद मदतकार्य करणे शक्य होणार आहे.
नियंत्रण कक्षामधून आपत्तीबाबत माहिती मिळाल्यानंतर दलामार्फत त्या ठिकाणी आपत्ती निवारणासाठीच्या तात्काळ उपाययोजना करण्यात येतील. दलाकडे आवश्यक वाहने व साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात येईल. या अनुषंगाने नमुंमपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी यांचेमार्फत आपत्कालीन प्रतिसाद दलांमधील अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक वाहने तसेच लाईफ जॅकेट्स, कटींग टूल्स (स्प्रेडर कटर कॉम्बी टूल्स इत्यादी), काँक्रीट कटर, पॉवर हॅमर, लेंडर, फायर एक्स्टिंग्युशर अशी तसेच इतर आवश्यक असणारी साधन सामग्री उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai