Breaking News
आयुक्तांंचे अधिकारी, कर्मचारी यांना निर्देश
नवी मुंबई ः मुसळधार अतिवृष्टी झाल्यानंतर नवी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मोठ्या उधाण भरतीच्या काळात पावसाचा जोर वाढल्याने प्रामुख्याने सीबीडी बेलापूर विभागात सेक्टर 4, 5, 6, 11 या सेक्टरमध्ये बराच काळ पाणी साचून राहिले. याबाबत पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अधिकाऱ्यांसह स्वत: क्षेत्रात उपस्थित राहून मदत व बचाव कार्याला गती दिली व दुसऱ्या दिवशी पाणी ओसरल्यानंतर रस्ते, गटारे, नाले स्वच्छतेवर भर दिला व जनजीवन सुरळीत होण्याला प्रथम प्राधान्य दिले.
या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांचेसह सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता यांची बैठक घेत आजपासून सर्वांनी महापालिका क्षेत्रात फिरावे व पावसाळ्यात अडचण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत प्रत्येक आठही विभागातील स्थितीचा बारकाईने आढावा घेताना या अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना जाणवलेल्या अडचणी समजून घ्याव्यात व त्याचे निराकरण करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी दिले. याकामी हलगज केलेली आढळळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले व या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देशित केले.
कामे करताना गटारे, नाले यामधून काढलेला गाळ उचलण्यासाठी तो सुकण्याची वाट न पाहता त्वरित उचलून घेतला जावा. झाडांची छाटणी केल्यानंतर तो हरित कचरा त्वरित उचलून नेण्याची कार्यवाही करण्याचे उद्यान व घनकचरा व्यवस्थापन विभागाने समन्वय राखून नियोजन करावे असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. अशाच प्रकारे पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे व झाडांच्या फांद्या पडल्यानंतर त्यादेखील त्वरित उचलून रस्ते, पदपथ मोकळे करण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश आयुक्तांनी दिले.
सुरू असलेली कामे सद्यस्थितीत बंद करून त्याठिकाणी कामाचा फलक असलाच पाहीजे याची दक्षता घ्यावी व सुरक्षेच्या दृष्टीने त्याठिकाणी स्टिलचे बॅरेकेटींग करण्यात यावे असे निर्देश देतानाच कामे करण्यासाठी खोदलेले खड्डे बुजवून त्याचे पुनर्पृष्ठीकरण करणेची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी असेही निर्देशित करण्यात आले. ैपावसाळी कालावधीत स्वच्छतेकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याची गरज असून सर्व स्वच्छताकर्मींना कंत्राटदारामार्फत रेनकोट, गमबूट अशी पावसाळी साधने वितरित झाली आहेत व त्याचा वापर ते करीत असल्याबाबत खातरजमा करून घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या. गावठाण व एलआयजी भागातील अंतर्गत स्वच्छतेकडेही लक्ष देण्याचे निर्देशित करण्यात आले.
पावसाळी कालावधीत स्वच्छता आणि आरोग्य या परस्परपूरक गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष देत जलजन्य व साथीच्या आजारांप्रमाणेच कोव्हीडचाही प्रभाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना युध्द पातळीवर राबविण्यात याव्यात तसेच पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा असे निर्देशित करण्यात आले. त्यासोबतच नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत व्यापक जनजागृती करण्याच्याही सूचना देण्यात आल्या. रस्ते, पदपथ, दुभाजक येथील स्वच्छता, दुरूस्ती आदी कामांची जबाबदारी एकाच विभागाकडे सोपविण्याबाबत नियोजन करण्यात यावे व त्याची तत्पर अंमलबजावणी करावी असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. पावसाळी कालावधीत प्रत्येक विभागाने दररोजच्या घडामोडी व त्यावरील उपाययोजना यांची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे संकलित करावी व त्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने गुगल शीट तयार करावी असे निर्देश देण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai