Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेतील घणसोली आगारात उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक बसला बुधवारी सकाळी 7.20 च्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीमध्ये घणसोली बस आगारात दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या जुन्या इतर 3 बस आगीच्या लपेट्यात आल्या. यामुळे एकुण चार बस खाक झाल्या आहेत. कोपरखैरणे, वाशी, नेरूळ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आग विझवली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली आगारात परिवहन विभागाच्या महालक्ष्मी कंपनीच्या 111 डिझेल बसगाड्या या आगारात उभ्या करण्यात आल्या होत्या. या बस पालिका परिवहन सेवेतून रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या 111 डिझेल बस या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या होत्या. या गाड्यांच्या समवेत 1 इलेक्ट्रिक बस दुरुस्तीसाठी मागील काही दिवसापासून उभी होती. तिला बुधवारी सकाळी अचानक आग लागल्यामुळे ती जळून खाक झाली असून त्याच्या बाजूला उभे असलेल्या 3 डिझेल बस गाड्या जळाल्या आहेत. परंतु अग्निशमन विभागाच्या सहकार्याने ही आग विझवण्यात आली आहे. सदर बसची नियमित दुरूस्ती करण्याची व सुट्ट्या भागांसह जबाबदारी मूळ उत्पादक व पुरवठादार मे एम.एच इको लाईफ तथा जे.बी.एम यांची होती. सदर बसला आयआर फेलर चा डिफेक्ट अहवाल संबंधित कंत्राटदाराचे तांत्रिक कर्मचारी व उपक्रमाचे कनिष्ठ अभियंता यांनी स्पॉटवर पोहचल्यावर सांगितले. या आयआर फेलर मुळे एखाद्या बसेसच्या बॅटरी पॅकमध्ये (04 बॅटरी पॅक) शार्ट सर्किट झाले व अचानक मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे उपस्थित तांत्रिक कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. परंतू 4 बॅटरी पॅक असल्याने व ते सर्व सील असल्याने बॅटरी शार्ट सर्किट होऊन आग जलद व मोठ्या प्रमाणात पसरली. या बससह उजव्या बाजूस उभ्या असलेल्या व मेजर दुरूस्तीस्तव बंद असलेल्या 03 डिझेल जन बस (मे. महालक्ष्मी बस ट्रान्सपोर्ट प्रा.लि. यांच्या कंत्राटमधील) यांना आग लागली. या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी किंवा दुखापत झालेली नाही. सदर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले व सदरची आग 7.35 ते 08.10 पर्यंत तातडीने प्रयत्न करून नियंत्रणात आली. सदर घटनेची नोंद रबाळे पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai