Breaking News
नवी मुंबई ः महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील पहिली ते आठवीचे वर्ग 16 जूनपासून सुरू होत असून शाळेच्या पहिल्या दिवशीच मुलांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जाणार आहेत. याबाबतची सर्व तयारी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण विभागाने केलेली असून इयत्ता पहिली ते आठवीच्या नवी मुंबई पालिकेच्या तसेच खाजगी अनुदानित अशा एकूण 152 शाळांमध्ये शिकत असलेल्या 61879 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येणार आहेत.
इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकापासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये तसेच शाळेत दाखल सर्व मुलांची 100% उपस्थिती टिकविणे त्याचप्रमाणे गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मोफत पाठ्यपुस्तक योजना सन 2025 -26 करिता विभागीय पाठ्यपुस्तके भांडार ते महानगरपालिका स्तर या टप्प्यातील पाठ्यपुस्तकांची वाहतूक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या वाहतुकदाराकडून करण्यात आलेली आहे. तसेच महापालिका ते शाळा स्तरापर्यंतची पाठ्यपुस्तके महापालिकेकडून 4 जून ते 10 जून 2025 या कालावधीत शाळेच्या मुख्याध्यापकांना वितरीत करण्यात आलेली आहेत.
ही पाठ्यपुस्तके संबंधित शाळेचे मुख्याध्यापक हे विभागातील पदाधिकारी, अधिकारी, पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी दि. 16 जून 2025 रोजी वितरित करतील अशी माहिती शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी दिलेली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai