Breaking News
नवी मुंबई ः नमुंमपा कार्यक्षेत्रामधील कुक्कुट, शेळी, मेंढी मांस विक्रेते यांच्या जनजागृतीसाठी मुंबई पशुवैदयकीय महाविद्यालयातील पशुवैदयकीय सामुहिक स्वास्थ विभागामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत कापणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान योजना कार्यरत आहे. मांस विक्रेत्यांना माहिती देण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर योजनेंतर्गत स्वच्छ आणि सुरक्षीत कुक्कुट, शेळी, मेढीं मांस उत्पादन करण्याकरिता तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाविषयी नमुंमपा कार्यक्षेत्रातील मांस विक्रेत्यांना माहिती देण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात मुंबई पशुवैदयकीय महाविद्यालय परेल आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये नमुंमपा कार्यक्षेत्रातील मांस विक्रेते मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. सदर कार्यशाळेचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक व योजना प्रमुख डॉ.रविंद्र झेंडे यांनी स्वच्छ मांस निर्मितीसाठी विकसीत तंत्रज्ञानाचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी व्यवसाय वृद्धीकरिता योग्य उपाय सांगून उपस्थित मांस विक्रेत्यांना प्रेरणा दिली.
महानगरपालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांनी मांस उत्पादन करताना वैयक्तिक आरोग्य व ग्राहकांचे आरोग्य याकडे लक्ष देण्याचे महत्त्व विशद केले. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत तोडकर यांनी टाकाऊ पदार्थांच्या पुनर्वापरातून नफा वाढवण्याचे मार्ग सूचवले आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाबाबत माहिती दिली.
यावेळी चर्चासत्रामधून व्यावसायिकांनी त्यांच्या अडचणी मांडल्या आणि तज्ज्ञांनी त्यांचे समाधानकारक निराकरण केले. सुरक्षित आणि दर्जेदार मांस उत्पादनासाठी अशा उपक्रमांची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात डॉ.विलास वैद्य, डॉ.विवेक शुक्ला, सुरेन तांबे, संतोषकुमार कोरी व इतर अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. मुंबई पशुवैदयकीय महाविद्यालयाचे सहा.प्राध्यापक डॉ.विवेक शुक्ला यांनी आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai