Breaking News
नवी मुंबई ः महापालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2025-2026 या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणानंतर महापालिका क्षेत्रात एकूण 501 इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये, अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा ‘सी-1’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या 51 इमारती तसेच इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-2 ए’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या 104 इमारती आणि इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-2 बी’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या 297 इमारती त्याचप्रमाणे इमारतीची किरकोळ दुरूस्ती या ‘सी-3’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या 49 इमारतींचा समावेश आहे.
धोकादायक इमारतींची यादी नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या यादीमध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करण्याच्या ‘सी1’ प्रवर्गामध्ये नमूद 51 इमारतींची नावे व तपशील नागरिकांना सहज कळावा यादृष्टीने ठळक अक्षरात प्रसिध्द करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 मधील तरतुदीच्या अनुषंगाने नोटीस प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार घोषित इमारतींमध्ये वास्तव्य करणारे मालक/भोगवटादार यांना ते राहत असलेली इमारत निवासी/वाणिज्य वापराकरिता धोकादायक असलेबाबत आणि या इमारतींमधील निवासी/वाणिज्य वापर तात्काळ थांबविणेबाबत तसेच धोकादायक इमारतींचे बांधकाम विनाविलंब तोडून टाकणेबाबत शासन परिपत्रकानुसार लेखी सूचना देण्यात आलेल्या आहेत. ‘सी-1’ प्रवर्गातील इमारतीची विदयुत व जलजोडणी खंडीत करण्यात येईल असेही यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. अशा धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतींचे मालक अथवा भोगवटादार यांनी ते रहात असलेल्या इमारतीचा वापर करणे धोकादायक असल्याने इमारत कोसळून जिवीत व वित्त हानी होण्याचा संभव लक्षात घेऊन सदर इमारतीचा/बांधकामाचा निवासी/वाणिज्य वापर त्वरित बंद करावा आणि सदरची इमारत विनाविलंब तोडून टाकावे असे सूचित करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची कार्यवाही न केल्यास, सदर इमारत कोसळल्यास होणाऱ्या नुकसानीस फक्त संबंधित जबाबदार असतील, नवी मुंबई महापालिका यास जबाबदार राहणार नाही असे स्पष्टपणे सूचित करण्यात आलेले आहे.
या नोटिसीमध्ये धोकादायक इमारतींच्या नावासमोर रहिवास वापर सुरु आहे अथवा नाही याचीही नोंद करण्यात आलेली आहे. इमारतीच्या वगकरणानुसार इमारतींचा भोगवटा वापर करणाऱ्या नागरिकांनी इमारत तात्काळ निष्कासीत करावयाची आहे किंवा वगकरणानुसार नमूद केल्याप्रमाणे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या भोगवटाधारकांनी इमारत दुरुस्त करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai