Breaking News
वनविभागाची जमीन 42 कोटींना हायवेला विकली
नवी मुंबई : गेल्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पनवेलच्या जे एम म्हात्रे यांच्या कंपनीवर ईडीने छापेमारी केली आहे. वनविभागाची सर्वे नं. 427-1, जमीन 1995 मध्ये खरेदी करुन ती नॅशनल हायवे ऑथोरिटीला विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यामध्ये जे एम म्हात्रे यांनी शासनाची 42 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करुनही शेवटी गंडांतर टाळता न आल्याने ‘तेल ही गेले तुप ही गेले हाती आले धुपाटणे’ अशी अवस्था म्हात्रे यांची झाली आहे.
पनवेल तालुक्यातील वहाळ गावातील सर्वे नं. 427 व 436 या जमिनींवर वनखात्याने 1953 साली वनाचे आरक्षण टाकले होते. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय वन कायदा अन्वये कलम 35(1) ची नोटीसही जारी केली होती. असे असतानाही इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जे. एम. म्हात्रे यांनी सदर जमिन कादरी यांच्याकडून 15 लाख रुपयांस विकत घेतली होती. सदर जमिनीवरील माती काढत असताना 2005 साली वनविभागाने म्हात्रे यांच्यावर कारवाई करुन त्यांचे पोकलन व डंपर जप्त केले होते. त्यावेळी त्यांनी सदर जमिन ही वनखात्याची असल्याचे आपल्याला माहिती नसल्याचा जबाब वनखात्याला दिला होता. त्यानंतर उत्खनन केलेल्या मातीचे स्वामित्व धन त्यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे भरले असल्याने त्यांना त्या कारवाईतून दिलासा दिला होता. त्यानंतर पळस्पा जेएनपीटी रस्त्याचे रुंदीकरण करताना ही जमिन त्यांनी खाजगी वाटाघाटीद्वारे नॅशनल हायवे ॲथोरिटीला 42 कोटींचा मोबदला घेऊन विकली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपुव त्यांच्या विरोधकांनी याबाबत तक्रार केली असता त्यांचेवर पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या कारवाईचा भाग म्हणून आरक्षित वनजमिनीचे बेकायदेशीर संपादन आणि विक्री प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जे. एम. म्हात्रे यांच्या पनवेल, दादर येथील मालमत्तांवर 17 जून रोजी ईडीने छापे टाकले. ही कारवाई 42 कोटी रुपयांच्या व्यवहाराशी संबंधित आहे. म्हात्रे यांच्या बँकेतील 44 कोटींच्या शिल्लक रकमेसह ठेवी, म्युच्युअल फंड गोठविण्यात आले आहे. 16.5 लाखांची रोकड जप्त केली आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात जे एम म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे या दोघांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी पक्षांतर केले तरी त्यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai