Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबईतील नागरिकांच्या विविध सुविधांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला. नवी मुंबईतील विकास आराखड्यास मंजुरी, करारपद्धतीने कार्यरत प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी सामावून घेणे, गरजेपोटी बांधलेली घरे अधिकृत करणे, नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा मंजूर करणे, पालिका क्षेत्रातील विकास शुल्काच्या रक्कमेबाबत तसेच खारघर ते नेरूळ धक्का सागरी मार्ग बेलापूरमधून न घेता सेक्टर 11 बेलापूर मधून विमानतळाला जोडणे आदी मागण्यांबाबत तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महापालिका आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत आढावा बैठक वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीस वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार कपिल पाटील, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, यांच्यासह नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, वन विभाग, उद्योग विभाग, एमआयडीसी, मेरी टाईम बोर्ड आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा महासभेच्या मान्यतेने अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला असून त्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी. महापालिकेने होर्डिंग व फेरीवाला धोरणाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी. तसेच अशा प्रकारचे धोरण महापालिकास्तरावर मंजूर करण्याबाबत विचार करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
बारवी धरणग्रस्तांना ज्या प्रमाणे विविध महापालिकांमध्ये कायमस्वरुपी नोकरी देण्यात आली आहे, त्या प्रमाणेच मोरबे धरण व सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी सामावून घेण्यासंदर्भात कालबद्ध आराखडा तयार करावा. ऐरोली जेट्टी चोवीस तास सुरू ठेवणे, शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प बाधित मच्छिमारांना भरपाई देणे, नवी मुंबईतील गावठाण विस्तारामध्ये गरजेपोटी बांधलेल्या घरांना अधिकृत करणे, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील घरांच्या किमती कमी करणे, नवी मुंबई विमानतळामध्ये स्थानिकांना नोकरी देणे, दगडखाण व क्रशर प्लॉटधारकांना पुनर्वसन म्हणून भूखंड देणे आदी विषयांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. खारघर सेक्टर 16 ते नेरूळ जेट्टी या प्रस्तावित सागरी किनारा मार्गातील बेलापूर सेक्टर 15 येथे डबल डेकर रस्ता तयार करता येईल का याचा विचार करावा. तसेच तुर्भे व कोपरखैरणे यांच्यामधील खैरणे गावाजवळ आणखी एक नवीन रेल्वे स्थानक उभारण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. खारघर ते नेरूळ जेट्टी सागरी मार्ग बेलापूरमध्ये न आणता तो सेक्टर 11 मधून विमानतळाच्या दिशेला न्यावा, तसेच नवी मुंबई पालिकेने तयार केलेला विकास आराखडा लवकर मजूर करावा, अशी मागणी मंत्री नाईक यांनी केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai