Breaking News
ठाणे : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याबाबत राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असूनही, दिबांच्या नावाची घोषणा न झाल्यामुळे भूमिपूत्र जनतेत अस्वस्थता होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकाराने माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, अतुल पाटील, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील नाव देण्याची मागणी सर्वप्रथम 2016 मध्ये कपिल पाटील यांनी खासदार असताना केली होती. त्यानंतर आगरी-कोळी समाज संघटित झाला. दिबांच्या नावासाठी मोठे जनआंदोलन उभे राहिले. त्यात आगरी-कोळी बांधवांबरोबरच अन्य समाजबांधवही उभे राहिले होते. त्यानंतर भूमिपूत्रांच्या रेट्यामुळे राज्य सरकारने विधीमंडळात ठराव मंजूर करून दि. बा. पाटील यांच्या नावाला मान्यता दिली. त्यानंतर हा ठराव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. परंतु, विमानतळाच्या नावाबाबत घोषणा होत नसल्यामुळे भूमिपूत्रांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर नामकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai