Breaking News
नवी मुंबई ः ‘स्वच्छतेतून आरोग्य, आरोग्यासाठी योग’ या सूत्रावर आधारित योगविषयक विशेष कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सिडको आणि द आर्ट ऑफ लिव्हींग यांच्या सहयोगाने वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात आयोजित करण्यात आले होते. अत्यंत भव्यतम स्वरूपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विविध वयोगटातील 5 हजारहून नागरिकांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.
याप्रसंगी राज्याचे वन मंत्री गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, स्वच्छ नवी मुंबई मिशनचे युथ आयकॉन आंतराष्ट्रीय जलतरणपटू शुभम वनमाळी, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या शिलादिदी, द आर्ट ऑफ लिव्हींगचे हनुमंत शिंदे, योग प्रशिक्षक प्रमोद कोकणे व दिप्ती देशपांडे, अनिल कौशिक, राजू शिंदे, रेखा चौधरी, तसेच महापालिकेचे विभागप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या धावपळीच्या जीवनात शरीराची व मनाची संपन्नता वाढविणारा योग हा आपल्या दररोजच्या जीवनशैलीचा एक भाग व्हायला हवा असे योगाचे महत्व सांगत वन मंत्री गणेश नाईक यांनी माणसाचे मन शुध्द व संतुलित करणाऱ्या योगाचे महत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक योग दिनाच्या माध्यमातून जगभरात वृध्दींगत केले असे सांगितले. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पंतप्रधान महोदयांच्या प्रेरणेतून मागील 11 वर्षांपासून सातत्याने योगविषयक कार्यक्रमाचे नवी मुंबईत आयोजन केले जात असल्याचा आनंद व्यक्त करीत आजच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्साह बघता नव्या पिढीतही योग परंपरा रूजत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनीही मनाच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा आजचा दिवस अतिशय आनंदाचा असल्याचे मत व्यक्त करीत आजच्या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन नागरिक आपल्या दररोजच्या नित्यक्रमात योगाचा समावेश करतील व शहराच्या स्वच्छतेप्रमाणेच मनाच्या स्वच्छतेत व मन:शांतीत पुढाकार घेतील असा विश्वास व्यक्त केला.
विशेष म्हणजे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांसह योगक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. द ऑर्ट ऑफ लिव्हींगच्या प्रशिक्षकांनी अगदी सहजसोप्या पध्दतीने योगक्रिया करून घेतल्या तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या शिलादिदी यांनी मन:शांतीची प्रात्यक्षिके करून घेतली. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाची वस्त्र समिती आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त सहयोगाने राबविल्या जाणाऱ्या वस्त्र पुनर्निर्माण सुविधा केंद्राव्दारे टाकाऊ कपड्यापासून पुनर्निर्मिती केलेल्या विशेष योगा मॅटवर मंत्रीमहोदयांसह आयुक्त व इतर मान्यवरांनी योगासने केली. यावेळी योगविद्येचे लाभ लिहिलेले वस्त्र तुकडे जोडलेली पुनर्निर्मित गोधडी प्रदर्शित करण्यात आली होती. याप्रसंगी नागरिकांच्या माहितीसाठी मांडलेल्या वस्त्र पुनर्निर्माण सुविधेच्या जनजागृतीपर स्टॉललाही मान्यवरांनी भेट देत या उपक्रमाची प्रशंसा केली व या उपक्रमात सर्व नवी मुंबईकर नागरिकांनी योगदान द्यावे असे आवाहन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai