Breaking News
नवी मुंबई ः मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय आणि लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई वाशी रुबी आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे (नेरूळ) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जून 2025 रोजी वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात जागतिक योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन योगगुरू देवदत्त चंदगडकर यांनी केले. त्यांनी योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे फायदे उपस्थितांना समजावून सांगितले. प्रात्यक्षिकांसोबत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधून योगाची शास्त्रीय मांडणी केली.
कार्यक्रमात वाचनालयाच्या कार्यकर्त्यांसह वाशी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. ‘निरोगी शरीरासाठी आणि शांत मनासाठी योग ही काळाची गरज आहे,’ असे मत प्रमुख वक्त्यांनी मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुभाष कुळकर्णी यांनी सांगितले की, आपल्या भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा आणि योग, योगासने त्याचबरोबर योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनात शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक व भावनिक यांचे संतुलन नीट राहण्यासाठी योगासने करणे खुप गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनयोग दिनाचे उद्दिष्ट सांगताना योगुरू श्री. देवदत्त चंदगडकर यांनी सांगितले की, लोकांना योगाच्या फायद्यांबद्दल जागरूक करणे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात, अनेक लोक शारीरिक आणि मानसिक ताणतणावाशी झुंजत आहेत, अशा परिस्थितीत योग करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे अनेक प्रकारचे आजार रोखता येतात, शरीर सक्रिय राहते आणि ताण कमी होतो. लायन्स क्लब ऑफ वाशी रुबी संस्थेच्या स्मिता वाजेकर, लीला शेठ आणि अंजली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित सदस्यांनी सूर्य नमस्कार आणि काही योगांची प्रात्यक्षिके केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे सर्व सदस्य, वाचनालयाचे कर्मचारी व लायन्स क्लबचे पदाधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai