Breaking News
नवी मुंबई ः लोकशाहीत प्रशासन जितके मजबूत तितकी लोकशाही समर्थ राहील. त्यामुळे सर्वांचीच जबाबदारी मोठी असल्याचे सांगत इतिहासात जे काही वाईट घडले त्याचे स्मरण ठेवून पुन्हा तशा गोष्टी घडू नयेत याकरिता आपण सर्वांनी जागरुक व्हावे यादृष्टीने आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण होत असताना विविध कार्यक्रम करण्याची संकल्पना पंतप्रधान महोदयांनी मांडली अशा शब्दात महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संविधान हे आपल्याला जगण्याची मूल्ये शिकवते व कर्तव्याचे भान देते, त्यामुळे त्याचा जीवनात अंगिकार करावा असेही त्यांनी प्रतिपादन केले.
भारतात 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू झाली त्या घटनेला 50 वर्षे पूर्ण होत असताना केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यास अनुसरून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात आयोजित विशेष कार्यक्रमाप्रसंगी ते मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी वन मंत्री गणेश नाईक यांच्यासह बेलापूर विधानसभा सदस्य आ.मंदाताई म्हात्रे, आ.शरद सोनावणे, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार तसेच महापालिका विभागप्रमुख, अधिकारी, माजी नगरसेवक मंचावर उपस्थित होते. आ.मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी बोलताना कार्यक्रमाला उपस्थित विदयार्थ्यांची मोठया प्रमाणावर उपस्थिती पाहून समाधान व्यक्त करीत देशाच्या भविष्यातील नागरिकांना इतिहासातील घटनांची माहिती मिळून लोकशाहीचे व संविधानाचे महत्व त्यांच्या मनात रुजवण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचे असल्याचे सांगितले. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार जगण्यासाठी किती महत्वाचे असतात याबाबत समाज प्रबोधन व्हावे यादृष्टीने आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण होत असताना केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार आयोजित केला जाणारा कार्यक्रम लोकशाहीचे महत्व अधोरेखित करणारा असल्याचे मत व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी प्रास्ताविकपर मनोगतात घटनेने नागरिकांना दिलेले अधिकार व कर्तव्य याची जाणीव जागृती करण्यासाठी महानगरपालिका ‘हर घर संविधान’ हा अभिनव उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली.
वेद काळापासून या देशात लोकशाही मूल्यव्यवस्था कार्यरत असून त्यानंतरही सम्राट अशोकाचे शिलालेख, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये लोकशाही मार्गाने सुरु असलेली प्रशासकीय व्यवस्था याचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. या निमित्त विष्णुदास भावे नाटयगृहाच्या भव्यतम पॅसेजमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या आणीबाणीविषयक छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रदर्शनामध्ये भारतात प्राचीन काळापासून सुरु असलेल्या लोकशाही व्यवस्थेची चित्रांकित माहिती तसेच आणीबाणीच्या काळातील घडामोडी आणि लोकशाही रक्षणासाठी लढणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची माहिती आहे. त्याचप्रमाणे लोकशाहीच्या सबलीकरणासाठी सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी उपक्रम, योजना यांचीही माहिती प्रदर्शिंत करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास अनुसरुन वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सेक्टर 16 मार्गे विष्णुदास भावे नाटयगृहापर्यंत विदयार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती. देशभक्तीपर गीतांच्या पार्श्वभूमीवर विदयार्थ्यांनी तिरंगा झळकवित तसेच ‘भारत लोकशाहीची जननी’, ‘लोकशाहीच्या ऊर्जेला सलाम’ असे फलक उंचवित रॅलीत उत्साहाने सहभाग घेतला.
नाटयगृहामध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘लोकशाही चिरायू होवो’ या कोऱ्या फलकावर वनमंत्री गणेश नाईक, आ.मंदाताई म्हात्रे, आ. शरद सोनावणे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार तसेच उपस्थित अधिकारी व नागरिकांनी स्वाक्षरी करुन तो फलक साक्षांकित केला. यावेळी केंद्र सरकारने विशेष प्रदर्शित केलेल्या आणीबाणी विषयक लघुपटाचे प्रक्षेपण करण्यात आले. तसेच ठाणे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत बनविण्यात आलेल्या आणीबाणीत सहभागी झालेल्या ठाणे जिल्हयातील व्यक्तींच्या मनोगताची चित्रफितही प्रदर्शित करण्यात आली.
व्यासपीठावर ठेवण्यात आलेली राजदंडाची प्रतिकृती लक्षवेधी होती. आणीबाणीच्या 50 व्या वर्षपूतचा हा कार्यक्रम संविधानाबाबतचाआदर व राष्ट्राभिमान दर्शवित लोकशाहीचा सर्वार्थाने जागर करणारा होता. यानिमित्त विष्णुदास भावे नाटयगृह येथे प्रदर्शित करण्यात आलेले आणीबाणीविषयक माहितीपूर्ण छायाचित्र प्रदर्शन पुढील महिनाभर तेथे ठेवण्यात येणार असून त्याठिकाणी नागरिकांनी आवर्जून भेट दयावी असे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai