Breaking News
लघु लेखक नरेंद्र हिरे निलंबित; 1.5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक
नवी मुंबई ः सिडको मध्ये कार्यरत असणारा लघु लेखक नरेंद्र हिरे याला सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडुन साडेचार लाखापैकी दिड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना अहवाल सादर केला आहे. यात कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका प्रमदा बिडवे यांचा या प्रकरणातील सहभाग असल्याने सिडको प्रशासनाने प्रमदा बिडवे यांची कार्मिक विभागातून उचलबांगडी केली आहे. सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ राजा दयानिधी यांनी गुरुवारी हे आदेश जारी केले आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार कल्याण पाटील (62) हे सिडकोतील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता असून काही महिन्यापूव निवृत्त झाले. निवृत्त झाल्या नंतर देयके व्याजासह रक्कम व उपदानाची रक्कम अदा करणे बाकी होते. हि हक्काची रक्कम मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यात लघु लेखक नरेंद्र हिरे यांनी व्यवस्थापकीय कार्मिक प्रदमा बिडवे, यांच्यासाठी तीन लाख व तक्रारदार यांची पगाराची रक्कम अदा करण्यासाठी तसेच विभागीय चौकशीत दोषमुक्त केल्याचा मोबदला म्हणून विभागीय चौकशी अधिकारी चंदलाल मेश्राम यांच्याकरीता 1 लाख रुपये व स्वत:करीता 50 हजार रुपये अशी एकूण 4 लाख 50 हजार रुपये लाचेची मागणी कल्याण पाटील यांच्याकडे केली होती. त्यामुळे पाटील यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर एसीबीच्या पथकाने गत 20 जून रोजी दुपारी सीबीडी बेलापूर येथील सिडको कार्यालयात सापळा लावून नरेंद्र हिरे यांना कल्याण पाटील यांच्याकडून दिड लाख रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर एसीबीच्या पथकाने नरेंद्र हिरे यांना अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. गत पाच दिवस हिरे न्यायालयीन कोठडीत होते, गुरुवारी त्यांची न्यायालयाने जामीनावर सुटका केल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एसीबीने केलेल्या या कारवाईनंतर सिडकोने नरेंद्र हिरे याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच प्रमदा बिडवे यांची कार्मिक विभागातून उचलबांगडी केली आहे. बिडवे यांच्या जागेवर आता विनू नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai