Breaking News
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज मंजूर झाल्याने नवी मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या असून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा मार्ग प्रशस्त झाला आहे. याबद्दल आ. मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
महापालिकेच्या विकास आराखड्याच्या अनुषंगाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाल्यानंतर भारतीय जनता पाटचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
नवी मुंबईतील विकास कामांबरोबरच येथील तरुणांना आणि खेळाडुंना आधुनिक क्रीडा आणि मनोरंजनासाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून अनेक वर्षापासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. बेलापूर गांव येथील कुस्तीच्या मैदानावर आधुनिक क्रीडा संकुल उभारणे, सीबीडी सेक्टर-3 राजीव गांधी मैदानालगत सुविधायुक्त इनडोअर स्पोर्टस्; इमारत बांधणे, नेरुळ सेक्टर-9 मधील भू.क्र.121-बी वर आचार्य तुळशी मैदानात आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करणे, वाशी सेक्टर-10ए मधील भू.क्र. 11 आणि 12 येथे विविध खेळांच्या आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करणे या सर्व सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याने नवी मुंबईतील तरुणांना आणि खेळाडुंना एक क्रीडा व्यासपीठ निर्माण होणार आहे, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या थोर विभूतींचे कार्य जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या स्वरुपात त्यांच्या पुतळ्यांची उभारणीकरिता जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी आमदार म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सकारात्मकता दाखवत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सदर समस्या सोडविण्याचे आदेश दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai