Breaking News
अनेक प्राधिकरणांसह 750 गृहनिर्माण संस्थांचा सहभाग
नवी मुंबई : नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. अशावेळी पुनर्विकास पारदर्शकपणे व्हावा आणि पुनर्विकासातील सर्वच भागधारकांना न्याय मिळावा म्हणून क्रेडाई एमसीएचआय युथने पुढाकार घेतला असून पुनर्विकास करु इच्छिणाऱ्या गृहनिर्माण संस्थांसाठी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात पनवेल, नवी मुंबई तसेच सिडको प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित राहणार असून या मार्गदर्शनाचा लाभ सर्व भागधारकांनी घ्यावा असे आवाहन क्रेडाई एमसीएचआय युथने केले आहे.
वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे रविवार, 29 जून रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हे मेगा पुनर्विकास मेळाव्याचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात नवी मुंबईतील 30 आघाडीचे विकासक एकत्र येणार आहेत. हे विकासक आपला पुनर्विकासातील अनुभव आणि प्रकल्प ऑफर प्रदर्शनाच्या माध्यमातून सादर करणार आहेत. पुनर्विकासाचा सक्रियपणे विचार करणाऱ्या नवी मुंबई आणि रायगडमधील 750 हून अधिक गृहनिर्माण संस्थांनी या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केलेली आहे. प्रदर्शनाचा उद्देश पारदर्शक, माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्यासपीठ तयार करणे आहे. यातून गृहनिर्माण संस्था आणि विकासक यांचा थेट संवाद होईल. हे व्यासपीठ नवी मुंबईच्या गृहनिर्माणाच्या पुनरुज्जीवनासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल. या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना क्रेडाई एमसीएचआय युथचे अध्यक्ष आणि अनंत बिल्डर्सचे एमडी जितेश अग्रवाल म्हणाले, की हे प्रदर्शन केवळ पुनर्विकासाबद्दल नाही, तर ते नवी मुंबईच्या भविष्याला आकार देण्याबद्दल आहे. आम्ही एक व्यासपीठ प्रदान करीत आहोत, जे गृहनिर्माण संस्थांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि योग्य विकासकांशी जोडण्यास सक्षम करते. तर क्रेडाई एमसीएचआय युथचे तत्कालीन अध्यक्ष आणि हावरे प्रॉपटजचे एमडी आणि सीईओ अमित हावरे म्हणाले, की या उपक्रमाद्वारे नवी मुंबईच्या विकासाला चालना देणारा विश्वास, पारदर्शकता आणि नवीन व्यवसाय संधी निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.
या वेळी अमित हावरे, क्रेडाई एमसीएचआय युथचे अध्यक्ष आणि अनंत बिल्डर्सचे एमडी जितेश अग्रवाल, एमसीएसआयच्या युवा सचिव आणि आशियाना ड्रीम होम्सच्या संचालक आशियान खोत, लकी डेव्हलपरचे एमडी सुमित अहलुवालिया, जुही डेव्हलपरच्या सीईओ जुई बजाज, एमसीएचआय समिती सदस्य आणि ईव्ही होम्सचे संचालक रिकी थॉमस उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai