Breaking News
मुंबई : एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएसला (अभिमत विद्यापीठ) राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या (नॅक) चौथ्या मूल्यांकनामध्ये अ++ हा सर्वोच्च दर्जा आणि 3.67 असा उल्लेखनीय सीजीपीए प्राप्त झाला आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संस्थात्मक काटेकोरपणा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठाने घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा सर्वोच्च सन्मान मिळाल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात मानचा तुरा रोवला गेला आहे.
2017 मध्ये पार पडलेल्या तिसऱ्या सायकलमध्ये एनएमआयएमएसला 3.59 असा सीजीपीए प्राप्त झाला होता. यंदाच्या सायकलमध्ये 3.67 गुण मिळाल्यामुळे विद्यापीठाने सर्व चारही सायकलमध्ये सातत्याने प्रगती दर्शवली आहे. नॅककडून मिळणारे मानांकन हे अत्यंत सखोल मूल्यांकन प्रक्रियेनंतर दिले जाते. या प्रक्रियेत अभ्यासक्रमविषयक बाबी, संशोधन निष्पत्ती, अध्यापन व अध्ययन प्रक्रियेचे मूल्यमापन, पायाभूत सुविधा, विद्यार्थी सहाय्य, प्रशासन आणि उत्तम कार्यपद्धती यांचा समावेश असतो. हा अ++ दर्जा पुढील सात वर्षांपर्यंत वैध आहे आणि त्यामुळे एनएमआयएमएसला देशातील उच्च शिक्षण संस्थांमधील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान प्राप्त झाले आहे.
हा उल्लेखनीय यशस्वी टप्पा कुलपती अमरिशभाई पटेल यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाचे प्रतीक असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या विद्यापीठाच्या दीर्घकालीन तत्त्वज्ञानाची साक्ष आहे. असे शिक्षण जे जागतिक पातळीवर सुसंगत असूनही स्थानिक गरजा ओळखून तयार करण्यात आले आहे. एनएमआयएमएसमध्ये नवकल्पना, प्रामाणिकपणा, सर्वसमावेशकता आणि आजीवन शिक्षण यांना प्राधान्य देणारी संस्कृती सातत्याने जोपासण्यात येत आहे.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रमेश भट म्हणाले ‘प्रत्येक मानांकनाचा अनुभव हा शैक्षणिक उत्कृष्टतेप्रती आणि संस्थात्मक गुणवत्तेप्रीत असलेल्या आमच्या अपार निष्ठेचे द्योतक आहे. हे यश आमच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांना, पालकांना, नियुक्ती करणाऱ्या संस्थांना, एक्झिक्युटिव्ह कौन्सिल, अकॅडमिक कौन्सिल, अभ्यास मंडळातील सदस्यांना आणि आदरणीय माजी विद्यार्थ्यांना समर्पित आहे. ते नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिले, पाठिंबा दिला आणि आमच्या ध्येयावर विश्वास ठेवला.
अ++ दर्जा प्राप्त झाल्याने एनएमआयएमएसने भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात उत्कृष्टतेचा एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. या यशामुळे एनएमआयएमएस विद्यापीठाला जागतिक पातळीवरील अग्रगण्य विद्यापीठांसोबत धोरणात्मक भागीदारी करण्याची, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याची आणि भारताला जागतिक शैक्षणिक केंद्र बनवण्याच्या उद्दिष्टात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर, उद्योगसज्ज व्यावसायिक आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार नेतृत्व तयार करण्याच्या आपल्या बांधिलकीवर विद्यापीठ ठाम आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai