Breaking News
नवी मुंबई ः “इंडिया रेटींग अँड रिसर्च“ (फिच) या राष्ट्रीय स्तरावरील अर्थविषयक मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी विविध संस्थांचे पत मानांकन जाहीर करण्यात येते. यामध्ये मागील 10 वर्षांप्रमाणेच याही वर्षी ‘इंडिया डबल ए प्लस स्टेबल’ हे सर्वोत्तम पत मानांकन नवी मुंबई महापालिकेस सन 2024-25 करीता जाहीर झाले असून अशाप्रकारे आर्थिक सक्षमतेचे डबल ए प्लस मानांकन सातत्याने अकरा वर्षे मिळविणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे.
देशातील निवासयोग्य शहरांमध्ये आघाडीवर असणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांच्या दर्जाकडे बारकाईने लक्ष देत नेहमीच दूरगामी दृष्टीकोन राखला आहे. महसूलविषयक जमा व खर्चाच्या बाबींकडेही काटेकोर लक्ष दिले आहे. जमा-खर्चाचा योग्य ताळमेळ राखण्याकडे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे बारकाईने लक्ष असून त्याला मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण लेखा विभागाची सुयोग्य साथ लाभत आहे. त्यामुळेच हे सर्वोत्तम आर्थिक पत मानांकन याही वर्षी लाभले आहे. अशाप्रकारे सातत्याने पत मानांकन मिळविणे ही सर्व नवी मुंबईकर नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट असून या मानांकनाबद्दल महापालिका आयुक्तडॉ.कैलास शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मागील आर्थिक वर्षात कर वसूलीची चांगली कामगिरी करण्यात आल्याने नवी मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती सक्षम राहिलेली आहे. या कालावधीत थकीत मालमत्ताकर धारकांना दिलासा देणारी मालमत्ताकर अभय योजना प्रभावीपणे राबविण्यात आली. त्यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मालमत्ताकर विभागाने आत्तापर्यंतचे सर्वोच्च 26 कोटीहून अधिक करवसूली केली. इतरही विभागांनी त्यांचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. महापालिका आयुक्तांमार्फत पालिकेच्या आर्थिक नियोजनाकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. करवसूलीमध्ये चांगली कामगिरी आणि नागरी सुविधांच्या योग्य बाबींवरच खर्च असे सुयोग्य धोरण अवलंबिल्याने तसेच ई गव्हर्नन्सची प्रभावी अंमलबजावणी करीत ई ऑफिस कार्यप्रणाली राबविल्याने कामकाजात गतिमानतेसोबतच पारदर्शकता आलेली आहे. लेखा विभागामार्फत ‘होस्ट टू होस्ट’ प्रणालीव्दारे देयके व रक्कमा अदायगी होत असून पालिकेचे कोणतेही पेमेंट पुरवठादाराच्या थेट बँक खात्यात जमा होत आहे. यामधून कामकाजात पारदर्शकता आली आहेच शिवाय कामकाजही पेपरलेस व गतीमान झाले आहे. कंत्राटदारांची अदायगी व अधिकारी, कर्मचारी यांचे पगारही वेळेवर होत आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई पालिकेकडे महाराष्ट्र शासन, एम.एम.आर.डी.ए., एम.आय.डी.सी. यापैकी कोणाचेही कर्ज, व्याज अथवा कर थकीत नाही. या साऱ्यांचे फलित म्हणजे हे पत मानांकन आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai