Breaking News
पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार
नवी मुंबई ः टो-गो अर्थात ट्रीटमेंट ऑफ वेस्ट ऑन द गो या युनिक वेस्ट मॅनेजमेंट कन्सेप्ट मुव्ही वेट वेस्ट कंपोस्टर या वाहनाचे राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विष्णुदास भावे नाट्यगृह येथे शुभारंभ करण्यात आला. याकरिता वन मंत्री गणेश नाईक यांच्या प्रयत्नातून ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. लाहस ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी मेड इन भारतच्या माध्यमातून ट्रीटमेंट ऑफ वेस्ट ऑन द गो ही पर्यावरण पूरक अशी संकल्पना म्हणजेच टो-गो यांत्रिक वाहन रूपात साकारली आहे.
या उपक्रमांतर्गत ऐरोली विभागातील सोसायटींमधील 3 हजार घरांमधून दैनंदिन दीड टन निर्माण होणारा ओला कचरा - वाहनामध्ये संकलन केल्यानंतर त्यावर वाहनातच प्रक्रिया करून खत तयार होणार आहे. सदर वाहन हे नैसर्गिक इंधनावर चालत असल्याने आणि त्याच्या प्रक्रियेसाठी सौर ऊर्जेचा वापर करत असल्याने टो-गो हे प्रदूषण विरहित वाहन आहे आणि निसर्गासाठी फारच सकारात्मक ठरणार आहे. हा एक प्रकारचा खत प्रकल्प असला, तरी इतर प्रकल्पात होणारा यंत्रसामुग्रीचा मोठा आवाज व त्याचे दुष्परिणाम यात होणार नाही. टो-गोची आवाज विरहीत कार्यपद्धती पर्यावरणपूरक अशी भूमिका बजावते. टोगो ही ठिकठिकाणी जाऊन ओला कचरा गोळा करते. याचवेळी हा कचरा गाडीच्या मागील बाजूस असलेल्या पॅनलवर वेचण्यात येतो. ओल्या कचऱ्याव्यतिरिक्त इतर कचरा वेगळा करण्यात येतो व उरलेला ओला कचरा तेथेच असलेल्या हायड्रोलिक बास्केटमधून मशीनच्या श्रेडरमध्ये जाऊन यानंतर तेथेच त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. तेथून तो कचरा स्क्रू प्रेसमधे येतो. यात हा कचरा पिळला जाऊन त्यातील ओलावा व द्रवपदार्थ बाहेर काढला जातो आणि उरलेला चोथा पुढे डायजेस्टर मध्ये जातो. येथे थर्मोफिलिक बॅक्टेरियांसाठी अनुकूल आणि पोषक असं वातावरण निर्माण केले जाते. यासाठी अत्याधुनिक प्रणालीद्वारे सेन्सर्सच्या सहाय्याने विशिष्ट तापमान व आर्द्रता नियंत्रित केली जाते. यामुळे आठ ते बारा दिवसात या कचऱ्याचे रूपांतर खतात होते. ओल्या म्हणजे घनकचऱ्याचे खतात रूपांतर होण्यासाठी जरी आठ दिवस लागत असले, तरीदेखील यात दररोज कचरा टाकला जाऊ शकतो आणि निर्माण होणारे कंपोस्ट खतही आपल्याला रोजच्या रोज मिळू शकते.
खत निर्मिती प्रक्रियेकरिता लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी यात मुंबई आयआयटीचे पेटंट असलेले सोलार एलुमिनियम ट्यूबलर एअर हिटर हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वाहनाच्या इंजिनपासून मिळणारी ऊर्जा या प्रक्रियेसाठी वापरली जाते. यामुळे घरोघरी जाऊन कचरा गोळा करत असताना देखील खत निर्मितीसाठी लागणारी सर्व प्रक्रिया यात सुरूच असते. तर कचरा उचलून झाल्यानंतर पार्किंगमध्ये वाहन उभे असताना विद्युत उर्जेवर हे वाहन खत निर्मितीची प्रक्रिया सुरू ठेवते. अशा पद्धतीने टो-गो हे यंत्र 24 तास खत निर्मितीचे कार्य करतच असते. या यांत्रिक वाहनामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाला अधिक आधुनिकता लाभून ते आणखी प्रभावी होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai