Breaking News
नवी मुंबई ः महापालिका उद्यान विभागाच्या वतीने पारसिक हिल, बेलापूर येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्षदिंडीसोबत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पावसाची संततधार असतानाही, सुखद आणि आल्हाददायक वातावरणात पेरू, चिकू, फणस, जांभूळ, सिताफळ, आवळा अशा 40 विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उद्यान विभाग परिमंडळ 1 उपायुक्त किसनराव पलांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, परिमंडळ 1 उपायुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ.अजय गडदे व परिमंडळ 2 उपआयुक्त स्मिता काळे, सहाय्यक आयुक्त उद्यान ऋतुजा गवळी, सहा.आयुक्त बेलापूर डॉ. अमोल पालवे, उद्यान अधीक्षक प्रकाश गिरी तसेच इतर पर्यावरणप्रेमी नागरिक, समाजसेवक, उद्यान कामगार उपस्थित होते. यामध्ये विशेषत्वाने पोलीस व होमगार्ड भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या चेंबूर येथील एआयएम अकादमीचे प्रशिक्षक अजित नाकाडे यांच्यासह त्यांचे 115 प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. सर्वांनीच अत्यंत उत्साहाने वृक्षारोपण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियनांतर्गत आयोजित करण्यात आलेला हा वृक्षदिंडी व वृक्षारोपण उपक्रम केवळ वृक्ष लागवडीपुरता मर्यादित नसून, हे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्गाशी नाते अधिक दृढ करीत, हरित आणि आरोग्यदायी भविष्याचा संदेश प्रसारित करण्यात आला. आगामी काळात नवी मुंबई महानगरपालिका अशाच लोकसहभागातून आणि सामूहिक प्रयत्नांतून शहराला अधिक हरित आणि शाश्वत बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai