Breaking News
नवी मुंबई ः महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) या दोन इयत्तांसाठी स्कॉलरशीप परीक्षा घेतली जाते. शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यम असलेल्या शाळांतील इयत्ता 5 वीचे 2441 विद्यार्थी व इयत्ता 8 वीचे 3509 विद्यार्थी असे एकूण 5950 विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ट झाले होते. या विद्यार्थ्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील इयत्ता 5 वीचे 851 विद्यार्थी व इयत्ता 8 वीचे 793 विद्यार्थी असे एकूण 1644 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.
या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापन शाळांमधील इयत्ता 5 वी च्या 129 व इयत्ता 8 वी च्या 110 अशा एकूण 239 विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील इयत्ता 5 वी च्या 25 विद्यार्थ्यांना व इयत्ता 8 वीच्या 22 विद्यार्थ्यांना अशाप्रकारे एकूण 47 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त झाले आहे. यामध्ये नमुंमपा शाळा क्र.42, घणसोली येथील स्वराली विठ्ठल जगधने (इयत्ता 8 वी) या विद्यार्थिंनीने महानगरपालिकेच्या शाळांमधून प्रथम क्रमांक मिळवला असून ठाणे जिल्हयातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच शुभ्रा भगवान गायकवाड (इयत्ता 5 वी) या विद्यार्थिनीने नमुंमपा शाळांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणाऱ्या स्वराली व शुभ्रा तसेच सर्वच गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांवर सर्व स्तरामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. नमुंमपा शिक्षण विभागाकडून महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शिका पुरवण्यात आल्या होत्या. तसेच जादा तासिकांचे आयोजन, वैयक्तिक मार्गदर्शन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन त्यासोबतच सराव परीक्षांचे केंद्र स्तरावर व शाळा स्तरावर आयोजन या सर्व बाबींमुळे नवी मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai