Breaking News
नवी मुंबई : नेरुळ, जुईनगर परिसर मोठ्या प्रमाणात समस्यांनी वेढला आहे. मागील पाच वर्षांपासून प्रशासनाचा कारभार आहे. या काळात सगळीकडे आरोग्य, अपुरा पाणी पुरवठा, खराब रस्ते-पदपथ, करोडो रुपये खर्च करून बंद पडलेल्या वास्तू अशा शेकडो समस्यांनी विभाग वेढलेला आहे. या समस्यांविरोधात मनसेने मनसे प्रवक्ते तथा शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ विभाग कार्यालयावर शिट्टी मोर्चा काढला. मोठ्या प्रमाणात समस्या असताना देखील झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना शिट्टी वाजवून महाराष्ट्र सैनिकांनी जागे करण्याचा प्रयत्न केला. शेकडोंच्या संख्येने स्थानिक नागरिक, महिला, मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
नेरुळ, सेक्टर-2, राजीव गांधी पूल ते कुकशेत गाव, नेरुळ विभाग कार्यालय असा शिट्टी मोर्चा काढण्यात आला. या अधिकाऱ्यांचे करायचे काय... खाली डोकं वर पाय; पाणी आमच्या हक्काचे... नाही कोणाच्या बापाचे, नेरुळ स्थानक परिसर फेरीवाला मुक्त झालेच पाहिजे; कंत्राटदार अधिकाऱ्यांचे लागे बांधे...नागरिकांचे रस्त्यावर चालण्याचे झाले वांदे, डांबर कमी खडी जास्त...रस्त्यावर खड्डे भरमसाठ; अधिकारी झोपा काढत राहिले...बांगलादेशींनी फुटपाथ बळकावले; अशा घोषणांनी महाराष्ट्र सैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
जुईनगर मधील क्रीडा संकुलचा वापर क्रीडा सोडून इतर बाबींसाठी होतो. नेरुळ पूर्व एलपीच्या पुढे रमेश मेटल येथील झोपडपट्टी मधील नागरिकांना पाणी मिळत नाही. जुईनगर, नेरुळ परिसरात दूषित पाण्यामुळे नागरिक, लहान मुले आजारी पडत आहेत. सगळीकडे निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. पुरेशी धूर फवारणी व काळजी न घेतल्यामुळे मलेरिया, डेंग्यू ने थैमान घातले आहे. तसेच नेरुळ, सेक्टर-1 मधील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात बसवला. पण त्याचे उदघाटन केले नाही. नेरुळ पूर्व ते जुईनगर सर्व्हिस रोड वर शोरूम वाले अनधिकृतपणे गाड्या पार्क करत आहेत. सेक्टर-3 मध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका नाही असे शेकडो प्रश्न मनसेचे सविनय म्हात्रे, अभिजीत देसाई, मनसे विभाग अध्यक्ष यांनी अधिकाऱ्यांना विचारले. बऱ्याच प्रश्नांची अधिकाऱ्यांकडे उत्तरे नसल्याचे दिसून आले. मनसेने उपस्थित केलेले सर्व प्रश्न जर अधिकाऱ्यांनी योग्य वेळेत सोडवले नाहीत तर यापुढे उग्र आंदोलन होईल असा इशारा गजानन काळे यांनी दिला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai