Breaking News
नवी मुंबई ः महानगरपालिका सरळसेवा भरती 2025 अंतर्गत गट - क आणि गट - ड यामधील एकूण 30 संवर्गातील 668 पदांकरिता 84,774 अर्ज प्राप्त झालेले आहेत. या पदांची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दि.16, 17, 18 आणि 19 जुलै 2025 या चार दिवसात घेण्यात येणार आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना परीक्षा देणे सोयीचे जावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 12 जिल्ह्यांमध्ये 28 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या नजीकच्या केंद्रावर परीक्षा देता यावी अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने काटेकोर रितीने व्हावी याकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कटाक्षाने लक्ष दिले असून परीक्षा सुव्यवस्थितरित्या पार पडाव्यात याकरिता प्रत्येक जिल्हयामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे वर्ग 1 श्रेणीचे अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर महानगरपालिकेचे 2 अथवा 3 अधिकारी केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
अमरावती जिल्हयात 7214, छत्रपती संभाजी नगर जिल्हयात 11964, कोल्हापूर जिल्हयात 4911, मुंबई उपनगर 1 व मुंबई उपनगर 2 जिल्हयात 22060, नागपूर जिल्हयात 6547, नांदेड जिल्हयात 5640, पुणे जिल्हयात 21683, रायगड जिल्हयात 201, सातारा जिल्हयात 621, ठाणे जिल्हयात 2025 आणि नाशिक जिल्हयात 1908 अशाप्रकारे 12 जिल्हयात 84774 उमेदवार परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. सदर परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस यांच्या माध्यमातून घेण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच परीक्षा प्रणालीतील प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष दिले आहे. परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षा प्रवेश पत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आले असून आत्तापर्यंत साधारणत: 75 हजार उमेदवारांनी प्रवेशपत्र ऑनलाईन डाऊनलेड केलेले आहे. उर्वरित उमेदवारांना एसएमएस व ई मेल व्दारे प्रवेशपत्रे लवकरात लवकर डाऊनलोड करावीत असे संदेश पाठविण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्रे घेऊन उमेदवारांनी आपल्या परीक्षा स्थळी प्रवेशपत्रात नमूद केलेल्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती - 2025 अंतर्गत घ्यावयाच्या ऑनलाईन परीक्षेचे संवर्गनिहाय वेळापत्रक नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे. सदर पदभरतीच्या परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये व माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे व त्यांचे तंतोतंत पालन करावे आणि परीक्षा केंद्रावर नमूद वेळेवर उपस्थित राहावे असे महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया ही अत्यंत काटेकोर व पारदर्शक पध्दतीने होत असून नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी करणाऱ्या भूलथापांना व आमिषांना उमेदवारांनी बळी पडू नये आणि याबाबत दक्ष राहून थेट स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी असे सूचित करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai