Breaking News
नवीमुंबई ः ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियानामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असताना यामध्ये विद्यार्थी सहभागावरही विशेष लक्ष दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर लहान वयातच स्वच्छतेचा संस्कार व्हावा व त्यामधून उद्याचे स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक घडावेत यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सहभागावरही भर दिला जात आहे. यावर्षीच्या अभियानाचा प्रारंभही 1 जुलै रोजी कुकशेत शाळेपासूनच करण्यात आला होता.
या अनुषंगाने नमुंमपा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त सहयोगातून महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ‘स्वच्छता पोस्टर स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 23 शाळांमधील 4562 विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपल्या मनातील स्वच्छतेच्या संकल्पना पोस्टर्सवर चितारल्या. 11 जुलै रोजी नमुंमपा प्राथमिक शाळा क्रमांक 36 कोपरखैरणे गाव, शाळा क्रमांक 33 पावणे गाव, शाळा क्रमांक 10 नेरुळ गाव, शाळा क्रमांक 15 शिरवणे गाव येथे पोस्टर स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये शाळानिहाय इयत्ता सहावी ते आठवीचे 450 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी पोस्टर्सच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व मांडावे तसेच त्यांच्यावर स्वच्छतेचे प्रभावी संस्कार व्हावेत याकरिता पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी अनेक पालकही उत्साहाने उपस्थित होते. अशाचप्रकारे 12 जुलै रोजी नमुंमपाच्या 23 माध्यमिक शाळांतील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धेमध्ये सहभागी होत मनातील स्वच्छताविषयक विचार चित्रांतून पोस्टर्सवर साकारले. चित्राच्या माध्यमातून स्वच्छतेविषयक जाणीव जागृती करण्याचा त्यांनी प्रभावी प्रयत्न केला. या स्वच्छता पोस्टर स्पर्धेमध्ये 23 शाळांमधील 4562 विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वच्छ पोस्टर्स स्पर्धा झाल्यानंतर पोस्टर्स स्पर्धेतील चित्रे पाहून स्वच्छता विषयक जागृती व्हावी याकरिता शाळा स्तरावर चित्रांचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व स्मिता काळे तसेच शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक 11 जुलै व शनिवार दिनांक 12 जुलै रोजी झालेल्या पोस्टर स्पर्धेमधील उत्तम पोस्टर साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शालेय स्तरावर बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai