Breaking News
नवी मुंबई ः ‘स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबईसाठी आपली एकजूट’ असा संदेश देत के रहेजा समुह संचालित इनॉर्बिट मॉलच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून यशलोक वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या सहकार्याने स्वच्छताकर्मीना पावसाळी रेनकोट वितरणाचा कार्यक्रम महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात उत्साहात संपन्न झाला.
‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियान अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात असून या अभियानाचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम संपन्न झाला. स्वच्छतेत देशात आघाडीवर असणारे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक असतांना प्रत्येक गोष्टीत पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपण्यावर महानगरपालिकेचा भर आहे. त्यादृष्टीने दिले जाणारे पावसाळी रेनकोट हे देखील वैशिष्टपूर्ण असून ते पुनर्प्रक्रियाकृत अर्थात रिसायकल प्लास्टिकपासून बनविले असल्याचे सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांनी सांगितले. कंत्राटदारांकडून स्वच्छताकर्मीना रेनकोट दिले जातात, त्यासोबत आणखी एक पर्यायी रेनकोट स्वच्छताकर्मींना उपलब्ध व्हावा यादृष्टीने हा रेनकोट दिला जात असल्याचेही ते म्हणाले. सामाजिक बांधिलकी जपत इनॉर्बिट मॉलच्या वतीने नेहमीच पर्यावरणपूरक कामांसाठी सहयोग दिला जातो त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांनीही स्वच्छताकर्मींबद्दल आपुलकी जपत त्यांना रेनकोट उपलब्ध करुन दिल्याबद्दल के रहेजा समुहाचा इनॉर्बिट मॉल यांचे आभार मानले. याप्रसंगी बोलताना के रहेजा समुहाचे सल्लागार किशोर भतीजा यांनी नवी मुंबईचे स्वच्छतेतील मानांकन उंचावण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या स्वच्छताकर्मींची पावसाळी कालावधीत काळजी घेण्याच्या दृष्टीने रेनकोट दिले जात असल्याचे सांगत ही त्यांच्या कामाप्रती व्यक्त केलेली आदर भावना आहे असे सांगितले.
यशलोक वेल्फेअर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात इनॲक्ट्स एच.आर. महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्यांच्या समुहाने कचऱ्यात टाकले जाणारे प्लास्टिक संकलित करुन पुनर्प्रक्रियाकृत रेनकोट बनविण्याच्या कार्यवाहीत महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. ‘जे करतात अथक काम, त्यांच्यासाठी आमच्याकडून सन्मान’ या भावनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात रेनकोट वाटपानंतर स्वच्छतामित्र व स्वच्छतासखी यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai